नाशिक - भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या नगरसेवक असलेल्या सुपुत्रांच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये बांधकाम विभागाकडून महिला बाल कल्याण समितीच्या राखीव निधीतून सुमारे १० कोटी २५ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणा-या महिला उद्योग भवनच्या प्रस्तावाला विरोधकांनी आक्षेप घेतला आणि या प्रस्तावाबाबत भाजपाला कोंडीत पकडले. अखेर विरोधकांच्या मागणीनंतर सहाही विभागात महिला उद्योग भवन उभारण्याबाबतचे प्रस्ताव तात्काळ महासभेवर सादर करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांना प्रशासनाला द्यावे लागले.पंचवटीतील प्रभाग ३ मधील म्युनिसिपल मार्केट व पार्कींग या प्रयोजनासाठी आरक्षित जागेपैकी ५ हजार २६० चौ.मी. मनपाच्या ताब्यातील जागेत महिला उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव महासभेत प्रशासनाकडून ठेवण्यात आला होता. या प्रस्तावाला राष्टवादीच्या नगरसेवक समीना मेमन यांनी आक्षेप घेतला. सदर उद्योग भवन पंचवटीतच का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी त्यासाठी महिला बाल कल्याण समितीचा निधी पळविण्यात आल्याचा आरोप केला. पंचवटीत आमदार निधीतून सदर भवन साकारणे सहज शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राष्टवादीचे गटनेता गजानन शेलार यांनी अंदाजपत्रकात तरतूद नसताना सदरचा प्रस्ताव महासभेवर आणलाच कसा, असा सवाल उपस्थित केला. आमदार सानप हे कार्यक्षम आमदार असून ते आपल्या मतदारसंघात ४०० कोटी रुपये आणू शकतात तर १० कोटी रुपये त्यांच्यासाठी किरकोळ असल्याचा टोलाही शेलार यांनी लगावला. डॉ. हेमलता पाटील यांनी उद्योग भवनला विरोध नसून त्यासाठी पळविण्यात आलेल्या निधीला आक्षेप असल्याचे सांगितले. विरोधीपक्षनेता अजय बोरस्ते यांनीही केवळ एकाच विभागात उद्योग भवन न उभारता ते सहाही विभागात उभारण्याची सूचना केली. यावेळी भाजपाचे गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी सदर उद्योग भवन हे सर्व शहरातील महिलांसाठीच असल्याचे सांगत या प्रस्तावाचे समर्थन केले तर दिनकर आढाव यांनी यावर्षी यावर निधी खर्चच होणार नसल्याचे नमूद करत अन्य विभागातही जागा सुचवत प्रस्ताव आणण्याचे आवाहन विरोधकांना केले. शाहू खैरे यांनी मात्र, पंचवटीतील अनेक मार्केट धूळखात पडून असताना अगोदर तेथे सुधारणा करा, असा सल्ला दिला आणि करायचेच असतील तर सहाही विभागात महिला उद्योग भवन उभारा, असे स्पष्ट केले. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी विरोधकांचा पवित्रा बघून सबुरीने घेत सहाही विभागात भवन उभारण्याची सूचना मांडली. त्यावर महापौरांनी सहाही विभागात महिला उद्योग भवन उभारण्याबाबत प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.भाजपा नगरसेवकांची बोलती बंदपंचवटीत आमदार बाळासाहेब सानप यांच्या आमदारनिधीतून भवन उभारण्याऐवजी महापालिकेचा निधी का पळविता, असा सवाल समीना मेमन यांनी केला असता भाजपाचे नगरसेवक जगदीश पाटील व रूची कुंभारकर हे आमदारांच्या समर्थनासाठी उभे राहिले आणि या कामात आमदारांचा कसलाही संबंध नसल्याचे ठासून सांगितले. परंतु, आयुुक्तांच्या प्रस्तावातच आमदार बाळासाहेब सानप यांच्या सूचनेवरुन असे नमूद केले असल्याचे मेमन यांनी सांगताच भाजपा नगरसेवकांची बोलती बंद झाली आणि नंतर त्यांनी सारवासारव करत आमदाराने महापालिकेला विकास कामे सुचवू नयेत का, अशी भूमिका घेतली. त्यातच विरोधीपक्षनेता बोरस्ते यांनी पंचवटीच्या कार्यक्षम आमदारांकडून विकास कामे होत असताना मध्य आणि पश्चिममधील आमदार कमी पडत आहेत काय, असा प्रश्न केला. उपमहापौरांच्या नेतृत्वाखाली मध्यच्या आमदारांची भेट घेण्याची कल्पनाही डॉ. हेमलता पाटील यांनी बोलून दाखविताच सभागृहात हशा पसरला.
नाशिकमध्ये भाजपा आमदाराकडून महापालिकेच्या महिला बाल कल्याण विभागाचा निधी पळविण्याचा घाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 7:56 PM
महासभेत महिला सदस्यांनी घेतला आक्षेप : अखेर सहाही विभागात भवन साकारण्याचा निर्णय
ठळक मुद्देपंचवटीतील प्रभाग ३ मधील म्युनिसिपल मार्केट व पार्कींग या प्रयोजनासाठी आरक्षित जागेपैकी ५ हजार २६० चौ.मी. मनपाच्या ताब्यातील जागेत महिला उद्योग भवन उभारण्याचा प्रस्तावप्रस्तावाला राष्टवादीच्या नगरसेवक समीना मेमन यांनी आक्षेप घेतला. सदर उद्योग भवन पंचवटीतच का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी त्यासाठी महिला बाल कल्याण समितीचा निधी पळविण्यात आल्याचा आरोप केला.