नाशिक - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेवर नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून निवडून द्यावयाच्या तीन जागांकरीता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून आठपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोध झाल्यातच जमा आहे. गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असल्याने बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा मुख्य निवडणूक अधिकारी गुरुनाथ दळवी करतील.नाशिक शाखेतून तीन जागांसाठी शाखेचे विद्यमान अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे, मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य राजेंद्र जाधव, नाट्यलेखक दत्ता पाटील, दिग्दर्शक सचिन शिंदे, दीपक मंडळाचे अध्यक्ष सुरेश गायधनी, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. बुधवारी (दि.२४) नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या कार्यालयात उमेदवारांची एकत्रित बैठक होऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय झाला. त्यानुसार, सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर एकमत झाले. त्यानंतर, पत्रकार परिषदेत बोलताना नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रविंद्र कदम यांनी सांगितले, निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अन्य पाच उमेदवार प्रा. रविंद्र कदम, राजेंद्र जाधव, दत्ता पाटील, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांनी स्वेच्छेने आपले माघारी अर्ज शाखेकडे दिले आहेत. सुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पाचही उमेदवारांचे माघारी अर्ज निवडणूक अधिका-याकडे सुपुर्द केले जातील. रंगकर्मींमध्ये कटुता असू नये आणि शाखेचाही निवडणूक खर्च वाचावा यासाठी बिनविरोध निवडीसाठी संबंधित उमेदवारांनी सहकार्यभाव दाखविला. सुनील ढगे हे गेल्या पंचवार्षिक काळात मध्यवर्ती शाखेवर सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या कारकीर्दीत शाखेला अनेक उपक्रम राबविता आले. सुरेश गायधनी यांनी सुद्धा यापूर्वी मध्यवर्ती शाखेवर काम केले असल्याने त्यांचा दीर्घ अनुभव आहे. सचिन शिंदे यांच्यासारखा प्रतिभावान कलावंत, दिग्दर्शक या निमित्ताने मध्यवर्ती शाखेवर जाणार आहे. त्यामुळे, येत्या पाच वर्षात नाशिक शाखेला उत्तमोत्तम काम करण्याची संधी लाभणार असल्याचेही प्रा.कदम यांनी सांगितले. शाखेची पहिल्यांदाच बिनविरोध निवड होत असल्याचेही प्रा. कदम यांनी सांगितले. यावेळी, सुनील ढगे, दत्ता पाटील, सचिन शिंदे, गिरीश गर्गे तसेच सुरेश गायधनी यांचे प्रतिनिधी कुंतक गायधनी आणि प्रफुल्ल दीक्षित यांचे प्रतिनिधी म्हणून राजेश भुसारे उपस्थित होते.उद्या माघारीचा दिवसमध्यवर्ती शाखेची निवडणूक ४ मार्चला होणार असून गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीचा अंतिम दिवस आहे. शाखेकडे पाचही उमेदवारांनी आपले माघारी अर्ज दिल्याने ते निवडणूक अधिका-याकडे जमा केले जाणार आहेत. दरम्यान, नाशिकप्रमाणेच धुळे-जळगाव आणि अहमदनगर शाखेचीही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती सुनील ढगे यांनी दिली. उत्तर महाराष्ट्रातून सात उमेदवार निवडून द्यायचे आहेत.
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 2:04 PM
तिघांच्या नावांवर एकमत : पाच उमेदवारांचा माघारीचा निर्णय
ठळक मुद्देतीन जागांकरीता उमेदवारांच्या नावावर एकमत झाले असून आठपैकी पाच उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेण्याची तयारी दर्शविल्याने निवडणूक बिनविरोधसुनील ढगे, सुरेश गायधनी आणि सचिन शिंदे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब