नाशिक : नाशिक शहर वेगाने विकसित होत असून येथील उत्तम हवामान, मुबलक पाणी, बांधकामाचा चांगला दर्जा, दळणवळणाच्या वाढत्या सुविधा या सर्व बाबींचा ‘नाशिक ब्रॅण्ड’ म्हणून सर्वत्र प्रसार व्हावा, असे मत शहरातील बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केले. असा प्रसार झाल्यास नाशिकमधील गुंतवणूक वाढण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
नाशिक लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने निर्माण ग्रुपचे चेअरमन नेमीचंद पोद्दार, पाटील ग्रुपचे संचालक नितीन पाटील आणि बागड प्रॉपर्टीजचे संचालक दीपक बागड यांच्याशी साधलेल्या संवादात त्यांनी वेगाने विकसित होत असलेल्या नाशिकबाबत विस्तृत विवेचन केले. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी तसेच सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी चर्चेत भाग घेतला.
नाशिकचा लौकिक हा धार्मिक शहर असा होता. त्यामुळे आजही राज्यातील तसेच देशातील अन्य शहरांमध्ये नाशिकची ओळख एक लहान शहर अशी आहे. मात्र, नाशिक आज वेगाने विकसित होत आहे. येथील बांधकामाचा दर्जा चांगला असल्याने तसेच किमती त्यामानाने कमी असल्याने गुंतवणूक वाढण्याला वाव आहे. मात्र, त्यासाठी ‘नाशिक ब्रॅण्ड’चा सर्वत्र प्रसार होण्याची गरज असल्याचे नितीन पाटील यांनी सांगितले.
नेमीचंद पोद्दार यांनी सांगितले की, स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये उद्योजकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उद्योजकांमुळे रोजगार उपलब्ध होऊन अर्थव्यवस्थेला गती मिळत आहे. मात्र, समाजाचा बिल्डरकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये आम्ही सर्व कामगारांना पूर्ण पगार दिला असल्याचेही त्यांनी सांगितले.
युनिफाईड डीसीपीआरमुळे नाशिकलाही अन्य विकसित शहरांप्रमाणे सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या ही, चांगली बाब असल्याचे दीपक बागड यांनी सांगितले. समृद्धी महामार्ग, नाशिक -पुणे रेल्वे मार्ग, हवाई वाहतुकीने देशाच्या राजधानीसह अन्य शहरांशी होत असलेला जलद संपर्क याचा फायदा नाशिकला मिळत आहे. त्यामुळे येथे गृहखरेदीसाठी अनेकजण पसंती देत असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो
झाडांची संख्या वाढविण्याची गरज
शहरामध्ये आता झाडे लावण्यासाठी जागा कमी होत आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतींमध्ये असलेल्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला झाडे लावल्यास त्यामुळे शहराच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे नवीन प्रकल्पांची उभारणी करताना जी झाडे लावणे गरजेचे असते, त्यापेक्षा अधिक झाडे लावली जात आहेत तसेच ज्या झाडांमुळे अधिक ऑक्सिजन मिळतो, त्यांचे अधिक प्रमाणात रोपण केले जात असल्याने ऑक्सिजनची उपलब्धताही वाढणार असल्याचे या चर्चेत सांगण्यात आले.
इन्फो
दूरचे नियोजन गरजेचे
शहरांचा विकास करताना येत्या २५ वर्षांमध्ये काय बदल होतील, याचा विचार करावयास हवा तसेच शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणे बांधताना त्यामध्ये दोन वर्षांचा पाणीपुरवठा होऊ शकेल एवढी क्षमता असावी, असेही या मान्यवरांनी स्पष्ट केले.
===Photopath===
090621\09nsk_31_09062021_13.jpg
===Caption===
बांधकाम व्यावसायिक