नाशिक : शहरातील गोरगरिबांसाठी महापालिकेने राबविलेल्या घरकुल याेजनेचा ठेका घेऊन बांधकाम करणारे रत्नाकर पवार यांच्याविरोधात या घरकुल बांधकामाच्याही तक्रारी आहे. त्यांच्यावर पुण्यातही गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, पवार यांनी जम्मू काश्मीरमध्ये एक कंपनी स्थापन करीत बनावट कंत्राट देऊन पैसे उकळून फसवणूक केल्याचा आरोप आहे. जम्मू काश्मीरच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी नाशिकमधून पवार यांना ताब्यात घेत जम्मू काश्मीर गाठले. यामुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
चार दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पोलिस शहरात आले होते. जम्मू पाेलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने पवार यांचा शोध घेत त्यांना नाशिकमधून ताब्यात घेत जम्मू-काश्मीर गाठले आहे. त्या ठिाकणी कंपनीत पैशांची गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांना गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी पवार यांना अटक केली आहे. गुंतवणूक केलेल्या लोकांना पैसे परत न केल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेत जम्मू-काश्मीर पोलिसांचे पथक चार दिवसांपूर्वी नाशिक शहरात आले होते.
त्यांनी पवार यांना ताब्यात घेतले. याबाबतची जम्मू पोलिस पथकाने पोलिस आयुक्तालयासह गंगापूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४२०नुसार जम्मू ई-डब्ल्यू गुन्हा नोंद क्रमांक १९/२०२२नुसार नोंद करण्यात आली आहे. या नोंदीवरून पवार यांच्याविरुद्ध मागील वर्षी जम्मू काश्मीरमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
२०१९ मध्ये पुणे पोलिसांनी केली होती अटक
पुणे येथील कोंढवा पोलिसांनीसुद्धा रत्नाकर पवार यांच्यासह सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात २०१९ मध्ये त्यांना पुण्याच्या कोंढवा पोलिसांनी नाशिकमध्ये येत अटक केली होती. याप्रकरणी पवार यांनी जिल्हा न्यायालयासह सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जामीनसाठी धाव घेतली होती; मात्र, जामीन मंजूर करण्यात आला नव्हता. पवार हे भाजपच्या महिला पदाधिकारी, तसेच जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीच्या माजी सभापती मनीषा पवार यांचे पती आहेत.