नाशिक महापालिकेची वाहतुकीची साधने वाढत असताना त्या अनुषंगाने विकासाचे वेगळे मॉडेलदेखील विकासाला पूरक ठरणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी मार्ग तयार करताना टीओडी म्हणजेच ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हपलमेंट करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. नाशिकमध्ये सातपूर येथील शिवाजीनगर ते नाशिकरोडदरम्यान मेट्रोचा मार्ग असताना त्याच्या बाजूने शंभर मीटर लांबीपर्यंत विशेष बाब म्हणून जाणीवपूर्वक वाढीव चटई क्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. म्हणजेच प्लॅन्ड सीटीप्रमाणेच हा एक नियोजनपूर्वक विकासित केलेला पट्टा असणार आहे. त्यापाठोपाठ आता सिन्नर फाटा येथे मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. मेट्रो, नाशिक : पुणे सेमी हायस्पीड रेल्वे आणि महापालिकेची सीटी लिंक बससेवा अशा समुच्चय सुविधा एकाच ठिकाणी असणार आहेत.
नाशिक महापालिकेने ८ सप्टेंबर रोजी सीटी लिंक या आपल्या बससेवेचा शुभारंभ केला. त्यासाठी सिन्नर फाटा येथे दहा एकर क्षेत्रात बस डेपो उभारण्याचे काम सुरू आहे. याच जागेनजीक नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी भूसंपादन करण्यात येत आहे. त्यामुळे महापालिकेच्या नियोजित डेपोची जागादेखील बाधित होणार असून, त्यामुळेच महारेल कंपनीने महापालिकेकडे रेल्वेसाठी जागेची मागणी केली. मात्र, याठिकाणी महापालिकेच्या डेपोचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून, ते आवश्यक असल्याने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी महापालिका व महारेल कंपनीच्या विद्यमाने मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हबचा प्रस्ताव मांडला. महारेल कंपनीचे अभियंता अविनाश कुलकर्णी यांच्याकडे दिला. तो व्यवहार्य असल्याचे महारेल्वेचे म्हणणे असून, मेट्रो निओ प्रकल्पदेखील याच परिसरातून जाणार असल्याने नाशिककरांना रेल्वे, शहर बस व टायरबेस मेट्रो एकाच छताखाली उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यादृष्टीने या भूखंडावर तीन मजली इमारत उभारून तेथे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे.
इन्फो...
काय आहे प्रस्तावात..
नाशिकराेड येथील नियोजित हब एकत्रित वापरामुळे महापालिका, महारेल व मेट्रो निओ या तिन्ही यंत्रणांचा खर्च वाचणार आहे. तसेच तिन्ही यंत्रणांना स्वतंत्र स्टेशन उभारण्याऐवजी एकाच इमारतीमध्ये तीनही ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध होतील. पहिल्या मजल्यावर रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर बस, तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो अशा प्रकारची रचना असणार आहे तसेच हबच्या इमारतीत मॉल असतील आणि कार पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. अशाप्रकारच्या वेगळ्या प्रकल्पामुळेदेखील नाशिकच्या दळणवळण सुविधेचे वैशिष्ट्य अधोरेखित हेाणार आहेे.