मनोज देवरेकळवण (जि. नाशिक) : उत्तर महाराष्ट्राची कुलदेवता, त्रिगुणात्मक स्वरूपी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास चैत्र शु. ९ अर्थात रामनवमी ३० मार्चपासून सुरुवात होत आहे. चैत्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. खान्देशची माहेरवासीन समजल्या जाणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला ३० मार्च ते ६ एप्रिल या दरम्यान चालणार आहे. यात्रेसाठी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांसह कसमादे भागातील लाखो भाविक परंपरेने दरवर्षी पायी गडावर येतात.
चार ते आठ दिवसांचा प्रवास करीत हे भाविक पौर्णिमेच्या दिवसापर्यंत गडाकडे पदयात्रेने मार्गक्रमण येत असतात. चैत्रोत्सव कालावधीमध्ये श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, तर्फे तसेच विविध धार्मिक संस्थांतर्फे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले आहे. याच कालावधीमध्ये विविध सेवाभावी संस्था गडावर व गडाकडे येणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी भाविकांना सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे. रामनवमीला श्री भगवतीची पंचामृत महापूजा सकाळी सात वाजता होणार आहे. दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा होऊन चैत्रोत्सवास प्रारंभ होईल. चैत्रोत्सव काळात दररोज सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल.ध्वजाची सवाद्य मिरवणूकनवरात्रोत्सवाचा मुख्य दिवस असलेल्या ४ एप्रिल रोजी मंगळवारी सकाळी सातला पंचामृत महापूजा, दुपारी साडेतीनला न्यासाच्या कार्यालयात ध्वजाचे पूजन, त्यानंतर ध्वजाचे मानकरी दरेगाव गवळी पाटील कुटुंबीयाकडे ध्वज सुपूर्द केला जाईल. तत्पूर्वी ध्वजाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येईल. याच दिवशी रात्री बाराला श्री भगवती शिखरावर कीर्ती ध्वजाचे मानकरी दरेगावचे गवळी पाटील ध्वजारोहण करतील. गडावर बुधवारी ५ एप्रिलला सकाळी ९.१८ वाजेपासून चैत्र पौर्णिमा प्रारंभ होईल. या दिवशी सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. गुरुवारी ६ एप्रिलला सकाळी सातला पंचामृत महापूजा होईल. सकाळी १०.३० वाजता चैत्र पौर्णिमा समाप्त होऊन चैत्रोत्सवाची सांगता होईल.