नाशिक - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छटपूजेला बंदी असतांना वालदेवीतीरी छटपूजा साजरी झालीय. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी घरातच छटपूजा साजरी करावी असं आवाहन करण्यात आले होते. मात्र, राज्यात सरकार असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकानेच छटपूजेला हजेरी लावत शुभेच्छा दिल्या.
उत्तर भारतीयांच्या परंपरेनुसार देवळाली येथे वालदेवी तीरावर वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी सहकुटुंब छटपूजा साजरी केली. नदीला दुग्धाभिषेक अर्पण करून सूर्याला अर्ध्या देत विधिवत पूजन केले. यावेळी स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी उत्तर भारतीयांना सणानिमित्त शुभेच्छा दिल्यe. वडनेर दुमाला येथील वालदेवी तीरावर नगरसेवक केशव पोरजे यांच्या वतीने स्थानिक उत्तर भारतीयांसाठी गेल्या सात वर्षापासून छटपूजेचे आयोजन केले जाते. या वर्षी गणेश विसर्जन, छटपूजेसाठी नगरसेवक निधीतून पोरजे यांनी ५० लाख रु. खर्च करत 'ब्रह्मगिरी' घाटाची उभारणी केली आहे.
या छटपूजेला छत्तीस तासांचा निर्जळी उपवास केला जातो. वालदेवी तीरी उत्तर भारतीय हजारो नागरिकांनी हजेरी लावत पूजेचा विधी पूर्ण केला. उसाच्या बांड्यांची मोळी बांधून नदीपात्रात उभी करत दीप प्रज्वलित करून सूर्याला दूध व पाण्याचे अर्ध देत दाम्पत्यांनी सूर्यास्ताला विधिवत पूजा केली.