नाशिक : एकेकाळी थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहराचे तापमान ४० अंशांवर पोहोचले आहे़ त्यामुळे शरीराची लाही लाही होऊन उष्माघातासारखे प्रकार घडू शकतात़ उन्हाळ्यात होणारी डोळ्यांची जळजळ, शरीराला वारंवार येणारा घाम, घसा कोरडा पडणे, अचानक ताप येणे आदी आजारांपासून वाचण्यासाठी रुग्णांनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी काळजी घ्यावी़, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टरांनी केले आहे़सूर्यकिरणाच्या उष्णतेने अथवा उष्णतेच्या संपर्कात मानवी शरीर आल्यानंतर शरीराच्या तापमानात अचानक वाढ झाल्यामुळे ताप येणे, त्याचबरोबर ताप न येता शरीरातील अवयवांना झटके येणे, पर्यायाने बेशुद्धावस्था प्र्राप्त होऊन शरीरातील प्रक्रिया बंद पडून मृत्यू आल्यास वैद्यकीय परिभाषेत त्याला उष्माघात असे म्हणतात़नाशिक शहरातील तापमान ४० अंशाच्यावर गेल्याने नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत असून सर्वच व्यक्तींना उष्णतेचा त्रास जाणवत आहे़ यापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे़ मुंबईच्या कुलाबा येथील भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेने बुधवार ते शनिवारपर्यंत नाशिक, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांसह उत्तर-मध्य महाराष्टÑात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला. उन्हाची तीव्रता प्रचंड वाढणार असल्याने नागरिकांनी सकाळी अकरा वाजेनंतर शक्यतो उन्हात फिरणे टाळावे, उन्हात बाहेर जाताना किंवा दुचाकीवरून फिरण्याची नोकरी करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याचप्रमाणे शरीरात पाण्याची मात्रा कमी होणार नाही, याकडे अधिकाधिक लक्ष पुरविणेही गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. एप्रिलअखेर निवडणुकीचे वातावरण प्रचारसभांनी तर शहराचे हवामान उष्णतेच्या लाटेने तापल्याचा अनुभव सध्या नाशिककरांना येत आहे. कमाल तापमानासह किमान तापमानदेखील वाढत असल्याने नाशिककरांना रात्रीदेखील उकाडा सहन करावा लागत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने शहरातील रस्ते सायंकाळपर्यंत ओस पडल्याचे चित्र दिसत होते. तसेच ताक, लस्सी, लिंबू सरबत, कोकम सरबत, उसाच्या रसाला मागणी वाढल्याचे दिसून आले. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळविण्यासाठी नागरिक थंडपेयाला प्राधान्य देताना दिसून आले.उष्माघातावर प्राथमिक उपचारउष्माघाताच्या रुग्णावर तत्काळ उपचार करण्याची आवश्यकता असते़ उष्माघाताचा प्रकार अथवा आजार गंभीर स्वरूपाचा असून, बहुतांश प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो़ त्यामुळे उष्माघाताची लक्षणे दिसताच त्यावर प्राथमिक उपचार केल्यास दाहकता कमी होते़वाढत्या तापमानामुळे उष्माघाताची शक्यता असते़ त्यामुळे उलट्या होणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसू लागल्यावर तातडीने डॉक्टरांकडे जावे़ त्यामुळे तत्काळ निदान होऊ शकते़ कडाक्याच्या उन्हात शक्यतो बाहेर पडू नये़ परंतु बाहेर पडल्यास सर्व शरीर झाकून घ्यावे़ सैल कपडे घालावे शरीरात पाण्याचे प्रमाण पुरेसे असावे. लिंबू पाणी, पन्हे, नारळपाणी प्यावे, कृत्रिम शीतपेये टाळावे़ - डॉ़ प्रशांत देवरे, अध्यक्ष, आयएमए, नाशिक शाखा
थंड हवेचे ठिकाण असलेले नाशिक शहर बनले उष्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:59 AM