नाशिक : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयारीमुळे शहराला भगवी झालर प्राप्त झाली असून, शहरातील विविध मंडळांनी वाकडी बारव येथून पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगीही मिळविली आहे. शिवजयंतीनिमित्त शहरातील शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण असून, या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. शहरातील चौकाचौकांमध्ये भगवे ध्वज, भगव्या पताका, मोठ्या आकारातील होर्डिंग्ज यांसह विद्युत रोषणाई करण्यात आल्याने शहरातील वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. शिवजयंतीनिमित्त मंगळवारी (दि.१९) ‘वंडर बुक आॅफ रेकॉर्ड्स इंटरनॅशनल लंडन’मध्ये नोंदणी झालेली १३० किलो वजनाची, १३ फूट लांब ९ इंच रुंद पाते असलेल्या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचा मानाच्या पहिल्या मिरवणुकीत समावेश करण्यात येणार आहे. ढोल-ताशासोबतच पारंपरिक वाद्याच्या तालात निघणाºया या मिरवणुकीत भवानी तलवारीची ही प्रतिकृती पाहण्याची शिवप्रेमींमध्ये उत्सुकता असल्याने मिरवणूक मार्गावर मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी पहायला मिळणार आहे. संपूर्ण शहरातून मिरवणुकीत सहभागी होणाºया शिवप्रेमींच्या स्वागतासाठी मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी मंच उभारण्यात आले असून, शहरातील नागरिकांनी अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मखमलाबाद नाका, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा आदी ठिकाणी शिवजयंतीसाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. शहरातील चौकाचौकात भव्य होर्डिंग्जवर शिवनेरी किल्ल्याची प्रतिमा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार, विविध मोहिमांच्या तयारीचे फलक यासह अश्वारूढ पुतळे, पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळ्यांसाठी मंच उभारण्यात येत आहेत.
असा असेल मिरवणुकीचा मार्ग जुने नाशिक परिसरातील वाकडी बारव येथून निघणारी मिरवणूक चौक मंडई, दादासाहेब फाळकेरोड, भद्र्रकाली मार्के ट, संत गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉइंट, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट अळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौकमार्गे रामकुंडावर पोहोचणार आहे.
पाच मंडळांना पोलिसांची परवानगी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक मार्गाने मिरवणूक काढणाºया छत्रपती सेना, इंदिरानगरचे स्वराज्य प्रतिष्ठान, डिंगर आळी संभाजी चौकातील शिवसाई फ्रेण्ड सर्कल, द्वारका परिसरातील अर्जून क्रीडा मंडळ, गजानन महाराज मित्रमंडळ या पाच मंडळांनी सोमवारी सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासनाकडून परवानगी मिळवली असून, या मंडळांचे चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत परवानगी मिळविणाºया आणखी काही मंडळांचीही यात भर पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.