नाशिक (सुयोग जोशी) : गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेला सिटीलिंक कंपनीच्या बस चालकांचा संप अखेर बुधवारी मिटला. चालक-वाहकांच्या बॅंक खात्यात वेतन जमा झाल्यानंतर बसेस रस्त्यावर धावल्या. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. सिटी लिंक बसेस सुरू करण्याच्या निर्णयाबाबत दुपारपर्यंत वाटाघाटी सुरूच होत्या.
७ मार्चपर्यंत थकीत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या बसवाहकांनी संप पुकारला होता. वेतन देण्याबाबत बुधवारी दुपारी मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, सिटी लिंकचे महाव्यवस्थापक बाजीराव माळी, व्यवस्थापक मिलिंद बंड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत चालक-वाहकांच्या बॅंक खात्यात थकित ६५ लाख रूपये वेतन जमा करण्यात आल्याने बसेस अखेर धावू लागल्या. थकीत वेतन देण्याचे आश्वासन कंत्राटदाराने न पाळल्यामुळे सिटी लिंकच्या वाहकांनी संपाचे हत्यार उपसले होते. यामुळे सिटी लिंकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली आहे. तर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी ठेकेदाराला त्वरित बस रस्त्यावर काढा, अन्यथा कडक कारवाई करून ठेकाच रद्द करण्यात येईल, अशी तंबी दिली होती.