नाशिक- गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या अत्यंत नगण्य झाली असून, त्या पार्श्वभूमीवर नवीन बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात अवघे दहा ते बारा बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे १४ मार्चपासून महापालिकेचे दोन कोविड सेंटर्स बंद करण्यात येणार आहेत. तसेच लाट ओसरल्याने महामारीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्बंध संपुष्टात आणण्यासाठी राज्य शासनाला पत्रव्यवहार करण्याचे निर्देश आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून शहरात कोरोनाच्या महामारीमुळे वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लागू आहेत. अद्यापही शंभर टक्के निर्बंध हटलेले नाहीत. राज्यात १४ जिल्ह्यांत निर्बंध हटवण्यात आले असले तरी, नाशिक जिल्ह्यात अपेक्षित लसीकरण न झाल्याने शंभर टक्के निर्बंध हटलेले नाहीत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली असून, त्यामुळे आता नाशिक शहर निर्बंधमुक्त करण्यासाठी वैद्यकीय विभागाने शासनाशी पत्रव्यवहार करावा, असे आदेशच महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिले आहेत. आयुक्त जाधव यांनी कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर हे आदेश दिले आहेत.
कोरोनाचे संकट अचानक उद्भवल्यानंतर आधी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि नवीन बिटको रुग्णालय कोरोनाबाधितांवर उपचारासाठी राखीव ठेवण्यात आले होते. मात्र, आता रुग्णसंख्या इतकी कमी होत गेली की, आता या दोन्ही रुग्णालयांत कोरोनाबाधितांसाठी अवघे दहा ते बारा बेड राखीव ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे मीनाताई ठाकर आणि ठक्कर डोम हे कोविड सेंटर्स १४ मार्चपासून बंद करण्यात येणार आहेत.
इन्फो...
कोविड सेंटर्सवरील साहित्याचा लिलाव
मीनाताई ठाकरे आणि ठक्कर डोम येथील कोविड सेंटर्स १४ मार्चला बंद करण्यापूर्वी तेथील सर्व साहित्य काढून घेण्यात येणार आहे. कोरोनाचे सर्व संकट टळल्यानंतर तेथील वैद्यकीय साहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे.
इन्फो..
कोरोना योद्धे ३ मार्चलाच सेवामुक्त
महापालिकेने वैद्यकीय विभागात मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कंत्राटी स्वरूपात डॉक्टर्सपासून आयापर्यंत तसेच वॉर्डबॉय नियुक्त केले होते. दर तीन महिन्यांनी त्यांना मुदतवाढ देण्यात येत होती. यात सुमारे साडेबाराशे कर्मचाऱ्यांची ३ मार्च राेजी मुदत संपताच त्यांना सेवामुक्त करण्यात आले आहे.