- श्याम बागुलनाशिक - तोट्यात चाललेल्या सिटी लिंक शहर बसचे उत्पन्न वाढीसाठी नाशिक महापालिका परिवहन मंडळाच्यावतीने वेगवेगळे ‘फंडे’ शोधले जात असून, बसच्या तिकीटावर व्यावसायिकांची जाहीरात छापण्याचे प्रस्तावित असतांना आता प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी ‘मुक्त प्रवास’ योजना सुरू करण्यात आली आहे. एक दिवसापासून ते सहा महिन्यांसाठी सवलतीत पास काढल्यास प्रवाशांचा चोवीस तासात कोठेही प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या माध्यमातून जुलै २०२१ पासून शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातही भागात ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ बससेवा चालविली जात आहे. सद्यस्थितीत ही बससेवा तोट्यात असली तरी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचे सक्षमीकरण आणि नागरिकांना सार्वजनिक परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या बससेवेमागील महापालिकेचा उद्देश आहे. मात्र गेल्या वर्षभरात डिझेल आणि सीएनजीच्या दरात झालेल्या भरमसाठी वाढीमुळे सिटीलिंकचा तोटा वाढल्याने सिटी लिंकने तोटा भरून काढण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधण्यास सुरूवात केली आहे.
प्रवाशी भाडेवाढ करण्याबरोबरच आता परवडत नसलेल्या फेऱ्या कमी करण्यात आल्या असून, शहरांतर्गंत धावणाऱ्या बसेसमध्ये डीजीटल फलकाद्वारे बस थांब्यालगतच्या व्यावसायिकांची जाहीरात करून त्यामाध्यमातून उत्पन्न वाढीचाही प्रयत्न अंतीम टप्प्यात आहे. बसच्या प्रवाशांची संख्या वाढावी व त्याचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा यासाठी ‘मुक्त प्रवास’ योजना सुरू करण्यात आली आहे.