नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात व्यापाऱ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या १ टक्का सेवा शुल्काच्या विरोधात नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेने शनिवारी नाशिक शहरात बंदची हाक दिली आहे. संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.१०) झालेल्या बैठकीत सर्व व्यापारी संघटनांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सेवा शुल्क आकारणी विरोधात धान्य किराणा व्यापाऱ्यांनी बुधवारी अचानक बंद पुकारल्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कडकडींत बंद पाळला.
कृषी उत्पन्न बाजार समितीकडून कोणत्याही प्रकारची सेवा शुल्क करण्यात येऊ नये, यासाठी नाशिकमधील सर्व घाऊक व किरकोळ किराणा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झाली. या बैठकीत सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी १ टक्का सेवा शुल्काच्या विरोधात बैठकीत शनिवार १२ डिसेंबर २०२० रोजी एकमताने नाशिक बंदचा निर्णय घेण्यात आला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे १ डिसेंबरपासून कोणतीही पूर्वसूचना न देता व्यापाऱ्यांकडून १ टक्का सेवा शुल्क आकारण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर गाड्या अडविल्या जाऊ लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सेवा शुल्कासंदर्भात पणन संचालकांनी यापूर्वी काढलेल्या आदेशाला राज्यात पणन राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. अशी स्थगिती देताना जुन्या पद्धतीने वसुली करावी, असे नमूद करण्यात आलेले नाही; मात्र नाशिक कृषी उत्त्पन्न बाजार समितीतर्फे सेवा शुल्क आकारणीस सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या या कारवाई विरोधात नाशिकमधील सर्व धान्य व्यापारी एकवटले असून, त्यांनी गुरुवारी एकत्रित बैठक घेऊन शनिवारी नाशिक बंदची हाक दिली आहे. या बैठकीला नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे राजेश मालपुरे, भावेश मानेक, राकेश भंडारी, पवन लोढा, नाशिक धान्य किराणा किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र पटेल, शेखर दशपुते, अरुण जातेगावकर, विजय काकड, नवीन नाशिक (सिडको) धान्य व्यापारी संघटनेचे विजय कुलकर्णी, नाशिकरोड देवळाली मर्चन्ट असोसिएशनचे राजन दलवानी, राजन बच्चूमल, जेलरोड किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील महाले, सातपूर परिसर किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रामनाथजी मुंदडा आदींसह सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून बंदच्या निर्णयाचे समर्थन केले.