नाशिक : गेल्या चार ते पाच दिवसांपासून नाशिक शहराचा किमान तापमानाचा पारा सातत्याने घसरत असल्यामुळे शहर गारठले आहे. महिनाअखेर गुरूवारी (दि.३०) शहराचे किमान तपमान सकाळी १०.२ अंश इतके नोंदविले गेले. राज्यात सर्वाधिक थंडी पुन्हा नाशिकला परतली आहे. या महिन्यात दुस-यांना नाशिकला थंडीचा कडाका जाणवला आहे. १२ नोव्हेंबर रोजी शहराचे तापमान १०.४ अंशावर घसरले होते.एकूणच सातत्याने घसरत असलेल्या तापमानामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये राज्यातील सर्वात निचांकी तपमानाची नोंद गुरूवारी झाली. यापुर्वीदेखील तापमानाचा पारा पंधरवड्यापुर्वी १०.४ अंशापर्यंत आला होता. शहरात वाढत्या थंडीमुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर करावा लागत असून नोकरदार वर्ग दिवसाही कार्यालयात हाफ स्वेटरचा वापर करताना दिसून येत आहेत. तसेच महिलावर्गही स्वेटर, शॉलचा वापर करण्यास प्राधान्य देत आहेत.
बॉडी लोशन, पेट्रोलियम जेली यांसारख्या क्रीमचा वापर वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे आणि वातावरणातील आद्रतेमध्ये होणाऱ्या घटामुळे त्वचा तडकण्याची समस्या निर्माण होते. त्यापासून बचावासाठी नागरिकांकडून बॉडीलोशनसारख्या मॉश्चराईजर क्रीमला मागणी वाढली आहे.नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढत असून, नाशिककरांनी उबदार कपड्यांचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.