शहरात मागील काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. गुरुवारी (दि.४) तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १३ अंशांपर्यंत वर सरकले; मात्र दोनच दिवसांत अचानक या दोन्ही तापमानात वेगाने घसरण झाली. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच शहर व परिसरात थंड वारे वेगाने वाहू लागले हाेते. यामुळे नाशिककरांना शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली. रात्री आकाश निरभ्र राहिल्याने पारा वेगाने घसरला आणि रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात १० अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वात नीचांकी तापमान नाशिकमध्ये असल्याने नाशकात थंडीचा कडाका सर्वाधिक जाणवला.
--इन्फो--
या शहरांमध्ये थंडीची लाट
नाशिकपाठोपाठ गोंदियामध्ये १०.२ तर जळगावात १०.४ आणि पुण्यात १०.८ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात ही शहरे कमालीची गारठली आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा सर्वाधिक परिणाम या शहरांमधील वातावरणावर होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस नाशिमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
---इन्फो--
जानेवारीअखेरपासून थंडीचा वाढला कडाका
२५ जानेवारी रोजी शहरात १०.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या संपूर्ण आठवड्यात १२ अंशांच्यापुढे किमान तापमान न गेल्याने थंडीची तीव्रता नाशिककरांना चंगलीच अनुभवायला आली होती. जानेवारी महिना थंडीच्या कडाक्याचा म्हणून ओळखला जात असला तरी फेब्रुवारीत थंडी गायब होईल, असे वाटत असताना पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नाशिककरांना ऊबदार कपड्यांच्या वापरावर अधिकच भर द्यावा लागत आहे.
--- इन्फो--
मागील वर्षाच्या तुलनेत थंडी कमीच
मागील वर्षी १७ जानेवारी २०२० साली किमान तापमानाचा पारा थेट ६ अंशांपर्यंत खाली घसरला होता. यावर्षी मात्र १० अंशांपेक्षा तापमान अद्याप खाली आलेले नाही. रविवारी या वर्षातील सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे यावर्षी गतवर्षाच्या तुलनेत थंडीचा प्रकोप तसा बघितला तर कमीच असल्याचे दिसून येते. हंगामात नववर्षाच्या प्रारंभी २३ डिसेंबर रोजी ८.२ अंशांपर्यंत तापमान घसरले होते.
---इन्फो--
मागील पाच वर्षांत शहराचे नीचांकी तापमान असे
११ जानेवारी २०१५ : ५.६
२२ जानेवारी २०१६ : ५.५
२१ जानेवारी २०१७ : ५.८
२९ डिसेंबर २०१८ : ५.१
९ फेब्रुवारी २०१९ : ४.०
१७ जानेवारी २०२० : ६.०