नाशिक - शहर व परिसरात अचानकपणे रविवारपासून हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे सोमवारी हंगामातील सर्वाधिक नीचांकी ७.३ तर मंगळवारीही १०अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविले गेले. सलग दुसऱ्या दिवशीही राज्यात सर्वाधिक थंडीचा कडाका नाशकात असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले. महाबळेश्वरसारखेच नाशिकदेखील मागील काही दिवसांपासून थंड हवेचे शहर बनल्याचा अनुभव नाशिककरांना येत आहे.
सोमवारी किमान तापमानाचा पारा या हंगामात प्रथमच 7.3अंशापर्यंत घसरला होता. मंगळवारी जवळपास 3अंशांनी काहीसा पारा वर सरकला असला तरी नाशिककरांना थंडीच्या कडाक्यापासून फारसा दिलासा मिळालेला नाही. मंगळवारी सकाळी व संध्याकाळी गोदाकाठी तसेच तापोवनात व शहराजवळच्या खेड्यात शेकोट्या पेटवून नागरिक थंडीपासून बचाव करताना दिसून आले. शनिवारी झालेल्या बेमोसमी पावसानंतर वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आणि नाशिककरांना हुडहुडी भरली ती सलग चार दिवसांपासून कायम आहे.
मंगळवारीसुद्धा दिवसभर वातावरणात गारवा टिकून होता. त्यामुळे नागरिकांनी उबदार कपड्यांच्या वापरास दिवस-रात्र प्राधान्य दिल्याचे चित्र नजरेस पडले. पहाटेप्रमाणे संध्याकाळीही शितलाहरींचा प्रभाव अधिक तीव्रतेने जाणवला. त्यामुळे शहराचा गजबजलेला भागदेखील रात्री 8 वाजेपासूनच सामसूम होऊ लागला होता. उत्तरेकडून शीतलहरींचा प्रवास पुन्हा वेगाने सुरु झाल्याने पारा वेगाने घसरणार असून आगामी काही दिवसांत थंडीचा कडाका अधिक वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
शहराचे साप्ताहिक किमान तापमान(अंश सेल्सि.) शनिवार(दि1.) - १४.८ रविवार (दि.2.) - १४.८ सोमवार(दि.3) - १६.९ मंगळवार(दि.4)- १४.५ बुधवार (दि.5) - १५.० गुरुवार (दि.6) - १५.४ शुक्रवार(दि.7) - १५.० शनिवार (दि.8) - १५.६ रविवार (दि.9) - १४.९