नाशिक : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी (दि.१) थंडीच्या चालू हंगामातील सर्वाधिक कडाक्याची थंडी नाशिककरांनी अनुभवली होती. त्यानंतर नाशिककरांना पुन्हा आठवडाभराने गुरूवारी (दि.९) थंडीचा कडाका सहन करावा लागला. किमान तापमानाचा पारा थेट १०.२ अंशापर्यंत घसरल्याची नोंद झाली. या हंगामातील ही नीचांकी नोंद ठरली. मागील बुधवारी १०.३ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या हंगामात पुन्हा तीसऱ्यांदा राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.शहराचा किमान तापमानाचा पारा घसरत असून, नागरिकांना मागील दोन आठवड्यांपासून थंडीच्या तीव्रतेचा सामना करावा लागत आहे. नव्या वर्षाचा मागील आठवड्यातही शहर गारठलेले होते. या आठवड्याच्या मध्यावर पुन्हा थंडीची लाट शहरात आल्याने नागरिकांकडे उबदार कपड्यांचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. बुधवारी संध्याकाळनंतर वातावरणात गारवा अचानकपणे निर्माण झाला होता. मध्यरात्रीपासून थंड वारे वेगाने वाहू लागल्याने गुरूवारी पहाटे थंडीचा चांगलाच कडाका नाशिककरांना अनुभवयास आला. सकाळी आठ वाजता हवामान निरिक्षण केंद्राकडून पारा मोजण्यात आला असता १०.२अंशापर्यंत तापमानापर्यंत खाली आल्याचे दिसून आले. दिवसभर लख्ख सूर्यप्रकाश असतानाही वातावरणात गारठा जाणवत होता. यामुळे कार्यालयांमध्ये काम करणा-या नोकरदारवर्गाने उबदार कपडे दिवसभर परिधान करणे पसंत केले. वाढत्या थंडीमुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू असून, तेथील धबधबेदेखील गोठले गेले असून, किमान तापमान उणे झाले आहे. यामुळे उत्तर भारतासह उत्तर महाराष्ट, विदर्भ, मराठवाड्याच्या वातावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागला आहे. राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद बुधवारी पुन्हा नाशिकमध्ये झाली. महाबळेश्वरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी पारा १३ अंशापर्यंत मोजला गेला. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी केले आहे. सर्दी-पडसे, खोकला, घसा खवखवणे यांसारख्या आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेत उपचार घ्यावा, असेही जगदाळे म्हणाले.आरोग्यावर परिणामथंडीचा कडाका वाढताच बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना पहावयास मिळत आहे. बहुतांश नागरिकांना सर्दी-खोकल्याचा त्रास जाणवू लागला आहे. पाणी उकळून पिण्याचा सल्ला डॉक्टरांकडून रुग्णांना दिला जात आहे. तसेच थंड गुणधर्माची फळे तसेच अन्य पदार्थ खाणे टाळावे, असेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. पहाटे तसेच रात्री घराबाहेर पडताना नाका-तोंडावर रुमाल किंवा उबदार कापड व डोक्यावरदेखील टोपी परिधान करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.----