- अझहर शेखनाशिक: शहरात जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवारी (दि.१५) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून नागरिक जुना गंगापुरनाका येथील डोंगरे वसतीगृह मैदानावर हा कार्यक्रम पार पडत आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्री नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे शहरात व्हीव्हीआयपी व्यक्तींची आज रेलचेल पहावयास मिळत आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे; मात्र कार्यक्रमस्थळाच्या दिशेने जाणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी सकाळी साडेअकरा ते साडेबारा वाजेच्या दरम्यान पहावयास मिळाली.
शासन आपल्या दारी या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, उर्जा मंत्री उदय सामंत, तसेच विधानपरिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती आहे.
या कार्यक्रमासाठी शासकिय अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती आहे. तसेच ५०० एसटी बसेस, १०० सिटी लिंकच्या बसेस, २ हजार मोटारींद्वारे नागरिक जिल्हाभरातून याठिकाणी दाखल होत आहे, असा अंदाज शहर वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेने वर्तविला आहे. यामुळे वाहतुक शाखेच्या उपायुक्त मोनिका राऊत यांनी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचनाही गुरुवारी (दि.१३) जाहिर केली होती. या अधिसूचनेनुसार शहरात शनिवारी डोंगरे वसतीगृह मैदानाकडे जाणाऱ्या गंगापुररोडवरील मॅरेथॉन चौक, चोपडा लॉन्स-हनुमानवाडी लिंकरोड, कॅनडा कॉर्नर, पंडित कॉलनी (ठक्कर बंगला) या पॉइंटवर बॅरेकेडिंग करण्यात आले आहेत. तसेच या मार्गावरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. सकाळी सहा वाजेपासून कार्यक्रम संपेपर्यंत हा बदल कायम राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे.
पोलिसांनी वाहतूक पर्यायी मार्गाने जरी वळविली असली तरीदेखील वाहतुक कोंडी सकाळी बघावयास मिळाली. मॅरेथॉनचौकापासून वाहतुकीला डाव्या बाजूला वळण देण्यात आले असून पंडित कॉलनीतील मनपाच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोरून वाहतूक शरणपुररोडच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. हा रस्ता अरूंद स्वरुपाचा असल्याने याठिकाणी वाहतुक कोंडी बघावयास मिळत आहे. तसेच गंगापुरनाका सिग्नलकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॅनडा कॉर्नर व्ही.एन.नाइक कॉलेजच्या अलिकडे बॅरेकेडिंग करण्यात आले आहे. यामुळे वाहतूक कॉलेजरोडने पुढे मार्गस्थ होत आहे. या दोन्ही रस्त्यांवर अतिरिक्त वाहनांचा ताण निर्माण होताना दिसत आहे.