नाशिक : महापालिकेने घंटागाडीचा ठेका रद्द केला आणि ज्या दुस-या ठेकेदाराला अतिरिक्त काम दिले तेही करीत नाही. त्यामुळे सिडको पाठोपाठ पंचवटीतही घंटागाडीचा बोजवारा उडाला आहे. ठिकठिकाणी कच-याचे ढीग साचले आहेत. त्यातच प्रभाग क्रमांक ३ मध्ये अशीच परिस्थिती असून, घंटागाडी नियमित नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे. नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्व:खर्चाने प्रभागात घंटागाडी सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. शिवसेना नगरसेविका पूनम मोगरे यांनी यांसदर्भात मनपा आयुक्तांना लेखी निवेदनाद्वारे तशी आहे.
प्रभागात घंटागाडी नियमितपणे येत नसल्याने नागरिकांना कचरा रस्त्यावर टाकावा लागत आहे. परिणामी रस्त्यावर कच-याचे ढिगारे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय प्रभागातील अनेक भागांत घंटागाडी येत नसल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेच, शिवाय लोकप्रतिनिधींवर रोष वाढत चालला आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडे घंटागाडीबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दखल घेत नसल्याने प्रभागात घंटागाडी सुरू करण्यासाठी मोगरे यांनी स्वत:च्या खर्चाने दोन ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर आणले असून, प्रभागात घंटागाडी अनियमित येत असल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा घंटागाडीत टाकता यावा यासाठी प्रभाग ३ मध्ये घंटागाडी सुरू करण्याची तयारी केली आहे, असा फलक घंटागाडीवर लावण्यात आला आहे.
मोगरे यांनी दोन दिवसांपूर्वी मनपा मुख्य कार्यालय गाठत पालिकेच्या आयुक्तांना प्रभागात स्व:खर्चाने घंटागाडी सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्याबाबत पत्रव्यवहार करत निवेदन सादर केले आहे. घंटागाडी ठेका रद्द केला असला तरी सध्या जुन्याच ठेकेदाराकडून काम केले जात आहे, असेही सांगण्यात येत आहे, तर दुसरीकडे अन्य विभागातील ठेकेदाराला पंचवटी विभागाचे काम दिल्याचेदेखील प्रशासन सांगत असल्याचे संभ्रमाचे वातावरण आहे. गेल्या अनेक दिवसांपासून घंटागाडी नियोजन कोलमडल्याची ओरड खुद्द पालिकेचे अधिकारी करत असले तरी याकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यातच आता मोगरे यांनी स्व:खर्चाने घंटागाडी सुरू करण्याची परवानगी आयुक्तांकडे मागितल्याने आता तरी पालिका प्रशासन विशेषत: मनपा आयुक्तकाय दखल घेणार याकडे लक्ष लागले आहे.