नाशिक : वीजमीटर रिडिंग व जनगणनेचा बहाणा करून महापालिका व महावितरण कंपनीचे कर्मचारी असल्याची बतावणी करत सहजरीत्या घरामध्ये प्रवेश करून दागिन्यांची लूट करणा-या त्या दोघा लुटारूंच्या मुसक्या बांधण्यास गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाला यश आले आहे. दोघा भामट्यांकडून सुमारे तीन लाख ९६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आठवडाभरापूर्वी पंचवटी, म्हसरूळ, उपनगर परिसरातील दोघा लुटारूंनी जनगणना विभाग, महावितरणचे कर्मचारी असल्याचे सांगून वीज बिल भरणा, वायरिंग तपासणीची कारणे दाखवत घरांमध्ये प्रवेश मिळवून घरातील वृद्ध महिलांना विविध प्रश्नांमध्ये गुरफटून ठेवत त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास दोघे प्रवृत्त करत होते. यासाठी हे दोघे भामटे तुळशीची पाने, पाणी हातात ठेवून काही मंत्रजाप करत आजारपण दूर करण्याच्या भुलथापाही देत होते. यावेळी वृद्ध महिलांनी दागिने काढून ठेवल्यास नजर चुकवून ते दागिने घेत घरातून पोबारा करत होते.
याबाबत वरील उपनगरीय भागांमध्ये लागोपाठ अशाच पद्धतीने दागिने लुटल्याच्या घटना घडल्याने नागरिक धास्तावले होते. अशाच एका भागात अपार्टमेंटच्या परिसरात दोघे भामटे पोहचले असता, त्यांचे चेहरे तिस-या डोळ्याने टिपले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, फुटेजमधील संशयित श्रीरामपूरमधील असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस नाईक संजय ताजणे यांना मिळाली. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ अधिका-यांना माहिती देत पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, नितीन भालेराव, परमेश्वर दराडे, मधुकर साबळे यांचे पथक श्रीरामपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले.--तीन दिवसांचा ठोकला तळगुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीरामपूर भागात तीन दिवस तळ ठोकून होते. श्रीरामपूर तालुक्यात शोधमोहीम राबविताना नखाते यांनी दिलेल्या निर्देशानुसार पथकाने संशयास्पद ठिकाणी चाचपणी सुरू केली. यावेळी बेलापूर रस्त्यावरून पडेगाव येथून शंकर रामदास लाड याला ताब्यात घेण्यास पथकाला यश आले. त्यानंतर बोंबले वस्ती टिळकनगर, श्रीरामपूरमधून साथीदार संतोष एकनाथ वायकर यास अटक केली. यांनी उपनगर, पंचवटी परिसरांत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे करीत आहेत.