नाशिक : शहरातील सायकल चळवळ व्यापक होण्यासाठी मोलाचे योगदान असलेल्या नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग बिर्दी यांच्या जयंतीनिमित्त शहरात सायकल राईड करून १४ गरजूंना सायकलींचे वाटप करण्यात आले. तसेच तीनशे किलो अन्नदानदेखील करण्यात आले.
गोल क्लब मैदान येथून नगरसेविका स्वाती भामरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. गोल्फ क्लब - मायको सर्कल - एबीबी सर्कल - सिटी सेंटर मॉल - इंदिरा नगर - साईनाथ नगर असा मार्ग होता. आमदार देवयानी फरांदे यांच्या निधीतून नव्याने साकारण्यात आलेल्या जसपालसिंग बिर्दी सायकल ट्रॅक येथे या राईडची सांगता झाली. या सायकल ट्रॅकवर सर्व सायकलिस्टने सायकलिंग करत प्रत्यक्षात ट्रॅकची पाहणी केली. जसपालसिंग बिर्दी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, महिला आयोगाच्या प्रमुख सौ. रोहिणी नायडू, जसपालजी यांचे वडील कुलदीपसिंग बिर्दी, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन, मुकेश ओबेराॅय, अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, श्रीकांत जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत गरजूंना सायकल वाटप, अनाजदान हा उपक्रम राबविण्यात आला. त्र्यंबक तालुक्यातील आदिवासी भागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना तसेच शहरातील ९ गरजू मुलींनादेखील सायकल देण्यात आल्या. तसेच पाच सिक्युरिटी गार्ड्सलादेखील कामावर जाण्यासाठी सायकल वाटप केले. तसेच ५ सिक्युरिटी गार्ड्सला सायकल देण्यात आल्या. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती यांच्याद्वारे वनवासी दुर्गम भागात वाटप करण्यासाठी सुपूर्द केले. सायकलिस्टच्या सचिव डॉ. मनीषा रौंदळ यांनी प्रास्ताविक केले. खजिनदार रवींद्र दुसाने यांनी आभार मानले. कार्यक्रमाला देविंदर भेला, मोहन देसाई, किशोर माने, सुरेश डोंगरे, नीता नारंग, सोफिया कपाडिया, पल्लवी पवार, प्रशांत भागवत, नितीन कोतकर, वैशाली शेलार, नाना आठवले, अनिल वराडे, साधना दुसाने, किशोर शिरसाठ, मोहिंदरसिंग आणि अन्य सायकलिस्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.