- धनंजय रिसोडकरनाशिक - नाशिकमध्ये ललीत पाटीलसारखे ड्रग्ज माफिया निर्माण होऊन त्यांचे जाळे वाढण्यासाठी नाशिकचे विद्यमान पालकमंत्री दादा भुसेच कारणीभूत असून माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचादेखील या सर्व प्रकरणाला आशीर्वाद आहे. या प्रकरणात पालकमंत्री, मंत्री, आमदार आणि पोलीसही सहभागी असतील, तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. भुसे यांना तर या प्रकरणात राजकारण सोडावेच लागेल इतकेच नव्हे तर तुरुंगातही जावे लागेल, असा दावा शिवसेना उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
या ड्रग्ज प्रकरणातील ललित पाटीलसारखे माफिया नाशिकमध्ये जन्माला येऊन त्यांना पोसणाऱ्यांमुळे नाशिकची कायदा सुव्यवस्था लयाला गेली आहे. त्याविरोधात शिवसेनेच्या वतीने २० ऑक्टोबरला भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राऊत यांनी यावेळी सांगितले. ड्रग्जविरोधातील आंदोलनाला या मोर्चाने प्रारंभ करणार असून भविष्यात आवश्यकता भासल्यास नाशिक बंदचादेखील अवलंब करण्यात येणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले. हा मोर्चा म्हणजे सरकारला इशारा देण्यासाठी मोर्चा असून त्यातून सरकारने काही धडा घेतला नाही तर वेळप्रसंगी मंत्र्यांच्या गाड्यांना मदत करतात, त्यांना सर्वांना धडा शिकवू असा इशारा देऊन ते म्हणाले की, हा आमचा इशारा मोर्चा आहे. या सर्व प्रकरणाचे हप्ते कोणाला जात होते कोण कोण यामध्ये सहभागी आहेत, त्यांची नावे आमच्याकडे आहेत, त्याचे पुरावेदेखील आमच्याकडे आहेत. आम्ही आघाडी सरकारमधून बाहेर पडावे यासाठी आमच्यावर दिल्लीवरून मोठा दबाव होता असेही राऊत यांनी नमूद केले.