नाशिक : शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात साथ असताना कर्मचारी काय करतात,हे बघण्यासाठी त्यांच्या सुट्यांचेदेखील मॉनटरिंग करण्यात येणार आहे.
शहरात गेल्या काही वर्षांत डेंग्यूचे रुग्ण वाढत असले तरी या वर्षांत जून-जुलै उजाडला असताना पावसाळ्यात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यू रुग्णांची संख्या अल्प होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचा प्रकोप कमी असल्यांचे सांगून प्रशासनदेखील गाफील होते. मात्र नंतर झालेल्या पावसानंतर डेंग्यूचा त्रास वाढतच गेला. यंदा तर थेट नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस सुरूच राहिल्याने गतवर्षीच्याच नव्हे तर आत्तापर्यंत सर्वांत जास्त रुग्ण आढळले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत संशयित रुग्ण संख्या दोन हजारांपेक्षा अधिक झाली तर केवळ नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभीच रुग्ण संख्या ६६ वर गेली.दिवाळीनंतर आयुक्त विदेशात होते. त्यानंतर ते परतल्यानंतर त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य वैद्यकीय अधिकारीपद सतत प्रभारी अधिकाऱ्यांकडे दिले जात असल्याने या खात्याची अवस्था बिकट होत चालली आहे. मध्यंतरी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक महापालिकेत बैठक घेतल्यानंतर आरोग्य विभागातील महत्त्वाची पदे तातडीने भरण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आयुक्तांना आरोग्य सचिवांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिकेस उपलब्ध करून देण्याचे आयुक्त गमे यांना मान्य केले होते त्यानंतर मात्र विधानसभा निवडणुकीमुळे विलंब झाल्याने आता तातडीने अधिकारी प्रतिनियुक्तीवर मागवण्यात येईल, असे गमे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या सुट्या अधिकृतरीत्या आहेत का ते परस्पर गायब होतात याची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.