नाशिक- सातपूर परिसरातील उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत होळी (रंगपंचमी) मंगळवारी (दि.१०) मोठ्या उत्साहात साजरी केली. महिलाही यात उत्साहात सहभागी झाल्या होत्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्र म पार पडले. विशेष म्हणजे यावर्षी पाण्याचा वापर न करता कोरड्या रंगांचा वापर करण्यात आला होता.
सातपूर परिसरातील अशोकनगर, श्रमिकनगर, शिवाजीनगर भागात उत्तर भारतीय मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. हिंदी प्रसारिणी सभा आणि नवदुर्गामाता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथील दुर्गा मंदिरात रंगपंचमीचे आयोजन करण्यात आले होते. कारखान्यात व अन्य ठिकाणी काम करणारे कामगार, व्यावसायिक सकाळी एकत्र आल्यानंतर त्यांनी कपाळावर रंगाचा टिळा लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतला. एकमेकांच्या अंगावर कोरडा रंग उधळला. यावेळी संगीत रजनीचा कार्यक्र म घेण्यात आला. यात अनेकांनी कला सादर केल्या. त्यानंतर एकमेकांच्या घरी जाऊन पुन्हा शुभेच्छा दिल्या. होळी (रंगपंचमी) निमित्त उत्तर भारतीयांच्या घरी खास उत्तर भारतीय खाद्यपदार्थ भुजिया, मालपूआ, गुलाबजाम, करंजी, शेवयीखीर यांसह विविध पदार्थ बनविण्यात आले होते.
यावेळी कृपाशंकर सिंग, विजयप्रताप त्रिपाठी, संतोष तिवारी, दिनेश शुक्ल, मुन्ना त्रिपाठी, विनयकुमार राय यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात दशरथ चौबे, सुभाष दुबे, श्रीलाल पांडे, के. के. तिवारी, शशी मिश्रा, आर. सी. दुबे, अलोक सिंग, प्रदीप राय, गौरव तिवारी, अनिल पांडे, रिंकू मिश्रा आदींसह उत्तर भारतीय मोठ्या संख्येने सहभाग झाले होते.