नाशिक : आदिवासी विकास विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी काढलेल्या अक्कलकुवा ते नाशिक पायी बि-हाड मोर्चा शनिवारी नाशकात धडकणार असल्याने या मोर्चेक-यांच्या सरकारविषयीच्या संतप्त भावना व यापुर्वीच्या मोर्चेक-यांनी आदिवासी विकास भवनावर बायका मुलांसह मारलेल्या ठिय्या आंदोलनाचा पुर्वानुभव अनुभव लक्षात घेता पोलीस व महसूल प्रशासनाने मोर्चाचा धसका घेतला आहे. या मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त करीत पोलिसांनी आदिवासी विकास भवन येथे आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याची विनंती आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला केली आहे.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे. ज्या मार्गावरून हा मोर्चा मार्गक्रमण करीत आहे तो मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्याची वेळ येत असून, भर तळपत्या उन्हात निघालेला हा मोर्चा आदिवासी विकास आयुक्तालयावर धडकणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घ्यायचे नाही असा निर्धार करूनच मोर्चेकरी त्या तयारीने निघालेले असल्यामुळे मोर्चेकरी किती दिवस रस्त्यावर बि-हाड मांडतील याची शाश्वती सरकारी यंत्रणेला नाही. प्रामुख्याने कंत्राटी कामगारांचे गेल्या आठ महिन्यापासून वेतन अदा करण्यात आलेले नाही त्यासाठी अनेक वेळा आंदोलन करूनही दखल घेण्यात आलेली नसल्याने प्रलंबीत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.नाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले असून, अशा परिस्थितीत भर उन्हात मोर्चेक-यांनी रस्त्यावर ठाण मांडल्यास व त्यातून उष्माघाताने काही अनुचित घडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस यंत्रणेने व्यक्त केली आहे. शिवाय इतक्या लांबून मोर्चेकरी पायी येत असल्यामुळे किसान मोर्चाप्रमाणे त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न भेडसावू शकतो अशा परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने आदिवासी विकास आयुक्तालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित करून मोर्चेक-यांचा प्रश्न आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाताळावा अशी विनंती शहर पोलिसांनी केली व तसे पत्रही त्यांनी जिल्हाधिका-यांना दिले आहे.
‘बि-हाड’ मोर्चाची नाशिक जिल्हा प्रशासनावर ‘आपत्ती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 2:40 PM
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथून गेल्या आठवड्यात निघालेला हा मोर्चा सुमारे अडीचशे किलो मीटर अंतर पायपीट करीत नाशिककडे मार्गक्रमण करीत असून, या मोर्चात सुमारे दोन हजाराहून अधिक आदिवासी कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यात तरूण, महिलांचे प्रमाण अधिक आहे.
ठळक मुद्देपोलीस हादरले : कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाची चिंतानाशिक शहरात सध्या ३८ डिग्रीपर्यंत उन तापलेले