नाशिक : जुन्या भांडणाची कुरापत काढून महिलेला गंभीर मारहाण के ल्याने उपचारादरम्यान सामनगावच्या रहिवाशी असलेल्या महिलेचा २०१५साली मृत्यू झाला होता. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात खटल्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुरूवारी (दि.१५) संशयित आरोपी सचिन रुंजा जगताप (३०) याला सहा वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सामनगाव येथे ६ सप्टेंबर २०१५ साली संशयित आरोपी सचिन याने जुन्या भांडणाची कुरापत काढून फिर्यादी विनोद बळवंत जगताप यांच्या आईला जबर मारहाण करत गंभीर जखमी केले होते. या मारहाणीत त्यांच्या मेंदूला मार लागल्याने उपचारादरम्यान जयराम रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. फिर्यादी जगताप यांच्या फिर्यादीवरुन नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सचिनविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरिक्षक बी.बी.थोरात यांच्याकडे होता. त्यांनी संशयिताविरुध्द सबळ पुरावे गोळा करुन जिल्हा व सत्र न्यायालयात्र दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू होती. या गुन्ह्यातील साक्षीदारांची साक्ष व न्यायालयापुढे सादर करण्यात आलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्याआधारे आरोपी सचिन यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एम.नंदेश्वर यांनी दोषी धरले. आरोपीला सहा वर्षे सक्त मजूरी व पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास सक्तमजुरीमध्ये तीन महिन्यांची वाढ करण्यात यावी, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील दिपशिखा भिडे यांनी कामकाज पाहिले.