अझहर शेख, नाशिक: राज्यात मान्सून दाखल झाला आहे. पावसाळा तोंडावर आला असून वारेही वेगाने वाहू लागले आहे. जलधारांचा वर्षावाला प्रारंभ कधीही होऊ शकतो. यामुळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून पावसाळ्यातील संभाव्य आपत्तीच्या घटनांचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना करत सज्जता ठेवली जात आहे. अलीकडेच जिल्ह्यातील एकूण १० सॅटेलाइट फोनची चाचणीही घेण्यात आली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकदेखील मागील महिन्यात घेत विविध विभागांना सूचना केल्या आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून काही दिवसांपूर्वीच गोदावरीच्या नदीपात्रात एनडीआरएफच्या मदतीने अग्निशमन दल, पोलिस क्युआरटीच्या जवान व आपदामित्रांना सोबत घेऊन पूरस्थितीत बचावकार्याची रंगीत तालीम घेण्यात आली हाेती. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे असलेली साधनसामग्री वगळता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेने राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडे अतिरिक्त पाच रबर बोटी, दोरखंड, रेस्क्यू वाहन, सर्चलाइटची अतिरिक्त मागणी राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडे नोंदविण्यात आली आहे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा ३० सर्चलाइट खरेदी करणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दहा सॅटेलाइट फोन
त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, कळवण, बागलाण, मालेगाव यांसारख्या तालुक्यांमधील अतिदुर्गम भागात ज्या ठिकाणी मोबाइल नेटवर्क सेवाही खंडित होते, यावेळी आपत्तीसमयी आपत्कालीन मदतीसाठी यंत्रणांना आपापसांत संपर्क साधता यावा, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून दहा सॅटेलाइट फोन यावर्षी खरेदी करण्यात आले आहे. वरील सर्व तालुक्यांत तहसीलदारांकडे प्रत्येकी एक तसेच मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी, तसेच जिल्हा नियंत्रण कक्षात तीन फोन कार्यान्वित आहेत.
अशी आहे साधनसामग्री
जिल्हा आपत्ती शाखेकडे ४ रबर बोट, दोरखंड, सर्चलाइट, तात्पुरता निवारा तंबू- १२, मेगाफोन पीए सिस्टम-२२, विविध प्रकारचे स्ट्रेचर-९८, इन्फलेटेबल लाइट सिस्टीम- २०, पाण्यावर तरंगणारे स्ट्रेचर-२०, लाइफ जॅकेट- ५०, लाइफ रिंग-८ उपलब्ध आहे.
५०० आपदा मित्रांचा बॅकअप
जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून दोन महिन्यांपूर्वी निवासी प्रशिक्षण देत तयार करण्यात आलेले ५०० आपदा मित्रांचा बॅकअप या वर्षी पावसाळ्यात उपयोगी ठरणार आहे. प्रत्येक तालुकास्तरावर आपदा मित्र स्वसुरक्षेच्या साधनांसह सज्ज आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेने त्यांचे दहा व्हॉटस्ॲप ग्रुप तयार केले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार विविध उपाययोजनांसह तयारी सुरू करण्यात आली आहे. साहित्याची तपासणी करून ते अद्ययावत केले जात आहे. आर्टिलरी सेंटरमधील पूर विभागदेखील आपत्ती व्यवस्थापन शाखेच्या संपर्कात आहे. तेथील अधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेत पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीसमयी मदतीसाठी तयारी दर्शविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय एनडीआरएफ पुणे-५ बटालियन, एसडीआरएफ धुळेदेखील संपर्कात आहे. - श्रीकृष्ण देशपांडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी.