नाशिक, दि. 8 - उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याचे प्रकरण ताजे असताना नाशकातील जिल्हा रुग्णालयात महिनाभरात तब्बल ५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. नाशिकमधील बालमृत्यूकांडामुळे सरकारी यंत्रणा खडबडून जागी झाली असून सभापतींनी विधानभवनात तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीसाठी वरिष्ठ अधिका-यांना बोलावण्यात आलं आहे.
नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपु-या असल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात मुळात १८ ‘वॉर्मर’ठेवण्याची क्षमता आहे. तेथे उपचारासाठी तब्बल ३५० अर्भके ऑगस्टमध्ये दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचे उघडकीस आले आहे.
या रुग्णालयात ‘टर्शरी केअर सेंटर’ नसल्यामुळे ऑक्सिजनची गरज भासणा-या नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने कबूल केले. विशेष, नूतन इमारतीकरिता शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, मात्र रुग्णालयाच्या आवारातील काही गुलमोहरांच्या झाडे तोडण्यास वृक्षप्राधिकरण समितीकडून परवानगी मिळत नसल्याने हे कामा रखडल्याचे डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
गोरखपूर बालमृत्यूकांड -बालकांच्या मृत्यूंमुळे देशभरात कुख्यातीने चर्चेत आलेल्या बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात ऑगस्ट महिन्यात एकूण २९६ बालकांचा मृत्यू झाला आहे. मेंदुज्वर रुग्ण कक्षात ८३ आणि नवजात शिशू कक्षातील २१३ बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. याच इस्पितळात मेंदुज्वर, नवजात शिशू आणि बालरुग्ण कक्षात यावर्षी जानेवारीपासून १,२५६ जणांचा मृत्यू झाला आहे.
बीआरडी रुग्णालयातील बालमृत्यमुळे डॉ. काफिला खान यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात सहा दिवसांमध्ये ६३ बालकांचा मृत्यू झाला होता. ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्याने १0 व ११ ऑगस्ट रोजी ३३ मुलांना जीव गमवावा लागला होता. डॉ. खान यांनी रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर्स आपल्या खासगी रुग्णालयासाठी वापरल्याचा आरोप आहे.
उत्तर प्रदेशातच गोरखपूर बालमृत्यूकांडांची पुनरावृत्ती -धक्कादायक म्हणजे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा गोरखपूर घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. फारुखाबाद येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा असल्याने 49 चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कायदायक घटना घडली आहे. .