- संजय दुनबळे (नाशिक)
जिल्ह्यात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात घेतलेल्या कांद्यापेक्षा यावर्षी मक्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा दिल्याचे चित्र सध्या नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये दिसून येत आहे. गेल्या वर्षी १२०० ते १३०० रुपयांपर्यंत जाणारा मका यावर्षी तब्बल १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला जात असल्याने यावर्षी भुसार माल उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन असल्याची चर्चा होत आहे.
जिल्ह्याच्या विविध भागांत खरिपात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली जाते. कांद्यापेक्षा कमी खर्चात भरघोस उत्पादन मिळणाऱ्या मक्याला शासनाने हमीभाव देण्याची घोषणा केली असली, तरी खुल्या बाजारात मात्र तेवढा भाव मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. मक्याला मिळणाऱ्या भावात उत्पादन खर्च भागून पुढील हंगामाच्या खर्चाची तोंडमिळवणी होत असल्याने शेतकरी मका पीक घेत असतात. अनेक शेतकरी मका पिकावर कांदा लागवडीचा खर्च भागवत असतात.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक भागांत मक्याचे उत्पादन घटले आहे. बाजारात आवक कमी झाल्याने यावर्षी ज्यांनी मोठ्या कष्टाने मका जगविला त्या शेतकऱ्यांना बरे दिवस आले असल्याचे चित्र दिसत आहे. या आठवड्यात जिल्ह्यातील लासलगाव, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला अशा विविध बाजार समित्यांमध्ये मक्याला चांगला भाव मिळत आहे. मागील सप्ताहाच्या तुलनेत यावेळी मक्याच्या भावात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाल्याची माहिती मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अशोक देसले यांनी दिली. मालेगाव बाजार समितीत दररोज २५०० ते ३५०० क्विंटल मक्याची आवक होत आहे. येथे मक्याला १७०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव आहे. चांदवड, लासलगाव, नांदगाव या ठिकाणीही मका याच भावाने विकला जात असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.
गहू, बाजरी आणि इतर कडधान्यांची बाजार समित्यांमध्ये आवक मंदावली आहे. या भुसार मालाचे भाव टिकून आहेत. मालेगाव बाजार समितीत बाजरीला २२०० ते २३००, तर लासलगावी १५७६ ते १९५१ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. नांदगाव, चांदवड, येवला या बाजार समित्यांमध्ये बाजरीची आवक कमी झाली आहे. यावर्षी रबीच्या हंगामात गव्हाचा पेरा कमी असल्याने गव्हाचे भाव टिकून आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत गव्हाला २०१० ते २६२६ रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळाला.
सोयाबीनसह इतर कडधान्याची आवक सर्वच बाजार समित्यांमध्ये कमी झाल्याने चांगले भाव मिळत आहेत. लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला २८०१ पासून ३२९० प्रतिक्विंटलपर्यंत भाव आहे. हरभराही ३४०० पासून ४००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला जात आहे. भुसार मालाला चांगला भाव असला तरी सर्वसामान्य शेतकऱ्यांकडे मात्र मालच उपलब्ध नाही. यावर्षी कांद्यापेक्षा भुसार मालाने शेतकऱ्यांना तारले आहे.