नाशिक : विधानसभा निवडणूकीचे नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत एकूण ५६ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. जिल्ह्यात या वेळेत सर्वाधिक कळवणमध्ये ६७.३५ तर दिंडोरी मतदारसंघात ६५.१७ टक्के इतके मतदान झाले. शहरात नाशिक पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक ४८.२९ टक्के इतके मतदान नोंदविले गेले. दुपारी २ वाजेनंतर शहरात मतदारांचा कल अधिक वाढल्याचे दिसून आले. पावसाने उघडीप दिल्यामुळे दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाशिक मध्यमधील विविध मतदान केंद्रे तसेच पुर्वमधील पंचवटी भागातील मतदान केंद्रांवर गर्दी लोटल्याचे दिसून आले.नाशिक शहर व परिसरात सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. सर्वच केंद्रांवर सकाळच्या सुमारास शुकशुकाट जाणवला. हळुहळु ज्येष्ठ नागरिकांची पावले केंद्रांकडे वळू लागल्याचे चित्र दिसले. सकाळी ११ वाजेपर्यंत शहरातील पुर्वमध्ये १२.७३%, मध्यमध्ये अवघे १०.६०% तर पश्मिमध्ये ११.५९% टक्के इतके मतदान नोंदविले गेले होते. यानंतर दुपारी १ वाजेपर्यंत अनुक्रमे वरील तीनही मतदारसंघात २२.९५ %, १९.३४%, २५.६४% टक्के मतदान झाले. दुपारपर्यंत अल्पशी वाढ वरील मतदारसंघात झाली; मात्र दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या संख्येने मतदारराजा घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढत गेला. मध्य मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४०.६६टक्के, पुर्वमध्ये ४० टक्के, पश्चिममध्ये ४८.२९ टक्क्यांपर्र्यंत मतदान नोंदविले गेले. सायंकाळी देवळाली मतदार संघाचा आकडा ४७.५२ टक्क्यांवर पोहचला होता.
Maharashtra Election2019 नाशिक जिल्ह्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५६ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 6:26 PM
दुपारी दोन वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत मोठ्या संख्येने मतदारराजा घराबाहेर पडल्याने मतदानाचा टक्का वाढत गेला.
ठळक मुद्देमध्य मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४०.६६टक्केपुर्वमध्ये ४० टक्केपश्चिममध्ये ४८.२९ टक्केदेवळाली मतदार संघाचा आकडा ४७.५२