नाशिक : शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे. काही दिवसांपासून किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली होती. प्रजासत्ताक दिनापासून किमान तापमानात सातत्याने घट होत असून पारा चढ-उतार होत आहे. गुरुवारी (दि.४) तापमान ११.८ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर पुन्हा कमाल तापमान ३१.३, तर किमान तापमान १३ अंशांपर्यंत वर सरकले; मात्र दोनच दिवसांत अचानक या दोन्ही तापमानात वेगाने घसरण झाली. रविवारी किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरले. ३१ अंशावरून थेट २८.३ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा खाली आल्याने नाशिककरांना रविवारी दिवसभर वातावरणात गारठा जाणवला. शनिवारी रात्री नऊ वाजेपासूनच थंड वारे वेगाने वाहू लागले हाेते. शनिवारी रात्रीपासूनच थंडीचा कडाका जाणवण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी ८.३० वाजता पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्रात १० अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले. राज्यात सर्वात नीचांकी तापमान नाशिकमध्ये थंडीचा कडाका जाणवला.जानेवारीअखेरपासून थंडीचा वाढला कडाका२५ जानेवारी रोजी शहरात १०.४ अंश इतके किमान तापमान नोंदविले गेले होते. या संपूर्ण आठवड्यात १२ अंशांच्यापुढे किमान तापमान न गेल्याने थंडीची तीव्रता नाशिककरांना चंगलीच अनुभवायला आली होती. जानेवारी महिना थंडीच्या कडाक्याचा म्हणून ओळखला जात असला तरी फेब्रुवारीत थंडी गायब होईल, असे वाटत असताना पुन्हा थंडीची तीव्रता वाढू लागल्याने नाशिककरांना ऊबदार कपड्यांच्या वापरावर अधिकच भर द्यावा लागत आहे. या शहरांमध्ये थंडीची लाटनाशिकपाठोपाठ गोंदियामध्ये १०.२ तर जळगावात १०.४ आणि पुण्यात १०.८ अंश इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. राज्यात ही शहरे कमालीची गारठली आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा सर्वाधिक परिणाम या शहरांमधील वातावरणावर होताना दिसून येत आहे. पुढील काही दिवस नाशिमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक थंडीची झाली नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 1:01 AM
शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे. शहराचे किमान तापमान वेगाने खाली घसरले असून रविवारी (दि. ७) थेट १० अंशांपर्यंत तापमान आल्याने राज्यात सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झाली. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्याने उत्तर महाराष्ट्रही गारठला आहे.
ठळक मुद्देकिमान तापमानात घट : १० अंशांपर्यंत घसरला पारा; नाशिककरांना भरली हुडहुडी