नाशिक : गेल्या चोवीस तासापासून पावसाची संततधार सुरू असल्याने सायंकाळपर्यंत ३९१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गंगापूरसह दारणा, भावली, कडवा आणि नांदूरमधमेश्वर धरणांची पातळीत वाढ झाल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदीला पूर आला असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरण क्षेत्रातील पावसाचा जोर वाढल्याने रात्री उशिरापर्यंत धरणातून सुमारे आठ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढला असून, संततधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. गंगापूर धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांच्या पुढे सरकला आहे, तर भावली धरण शंभर टक्के भरले आहे. दारणा धरणाची वाटचालदेखील शंभर टक्केकडे झाल्याने येथूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. दारणा धरणातून १३,०५८ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. कडवा धरणातून १०,९९८, तर नांदूरमधमेश्वरमधून २३,९५९ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.पावसाचा जोर वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून धरणक्षेत्रात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जिल्ह्णातील एकूण २४ प्रकल्पांमध्ये पाण्याचा साठा ४१ टक्के इतका झाला आहे. मागीलवर्षीच्या तुलनेत अजूनही धरणांमध्ये अपेक्षित साठा नसला तरी पावसाचा जोर वाढत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. मागीलवर्र्षी याच दिवशी जिल्ह्णातील एकूण धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली होती.
नाशिक जिल्ह्यात ३९१ मिमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 1:42 AM