नाशिक : शहरातील सातपूर भागात विवाहितेवर अत्याचाराचा प्रयत्न करून महिलेसह सहा वर्षीय मुलाची खूनाची घटना २०१६साली घडली होती. या घटनेचा खटला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू होता. या दुहेरी खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले होते. याप्रकरणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांनी संशयित आरोपी रामदास शिंदे यास उपलब्ध पुराव्यानुसार दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावली.
आरोपी रामदास शिंदे
सातपूर परिसरातील कार्बन नाका परिसरात कचरू संसारे हे पत्नी, तीन मुली, मुलासोबत शिंदे यांच्या घरात भाडेतत्त्वावर राहत होते. उन्हाळी सुटी लागल्याने तीनही मुली गावी गेल्या होत्या, तर कचरू संसारे हे कामानिमित्त रात्रपाळीवर कंपनीत गेले होते. १८ एप्रिल २०१६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रामदास शिंदे याने घराच्या पाठीमागील दरवाजाने संसारे यांच्या घरात शिरून पल्लवी संसारे यांच्याकडे अनैतिक संबंधाची मागणी केली. त्यास पल्लवी हिने विरोध केल्याने रामदास याने चाकूने पल्लवी यांच्यावर वार केले होते. या घटनेत पल्लवी यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्यांचा सहा वर्षाचा मुलगा विशालही झोपेतून जागा झाल्याने त्याने सर्व प्रकार बघितला. यावेळी रामदास याने त्याच्यावरही चाकूने वार करून त्याला ठार मारले. घटनेनंतर रामदास याने घराला कुलूप लावून पळ काढला. सरकारी पक्षातर्फे अॅड. अजय मिसर यांनी युक्तिवाद करीत रामदासविरोधात पुरावे न्यायालयापुढे सिद्ध केले. सहा वर्षीय बालकासह एका विवाहितेची हत्त्या करणा-या आरोपीला समाजात जिवंत राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जावी, असा युक्तीवाद मिसर यांनी अखेरच्या सुनावणीमध्ये केला होता. आरोपी शिंदे याने स्वत:च्या तीन मुलांचा विचार करत न्यायाधीश शिंदे यांच्याकडे दयेची मागणी केली होती. याबाबत बुधवारी (दि.२५) अंतीम सुनावणी होऊन दोन्ही बाजूंचा अखेरचा युक्तीवाद न्यायालयाने ऐकून घेत निकाल राखून ठेवला होता. गुरूवारी (दि.२६) दुपारी न्यायालयाने याप्रकरणी आरोपी रामदास यास दोषी ठरविले व फाशीची शिक्षा सुनावली.