नाशिक: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून नाशिक विभागाचा निकाल ९१.६६ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे यावर्षी देखील मुलींनीच बाजी मारली असून मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.४६ टक्के इतकी आहे.
नाशिक विभागातून यंदा १,५९,००२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यामध्ये मुलांची संख्या ८९,१०५ इतकी तर मुलींची संख्या ६९,८९७ इतकी होती. उत्तीर्णतेमध्ये मुलींचे प्रमाण ९४.४६ टक्के इतके आहे तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८९.४६ टक्के इतके आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकमधून मुलींची भरारी कायम आहे.
नाशिक विभागातून प्रथम श्रेणीत म्हणजेच ७५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १४,४१६ इतकी आहे तर ६० टक्केच्यापुढे गुण मिळविणारे विद्यार्थी ५५,८१७ इतकी आहे. विभागातून एकुण १,४५ हजार ७४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.६६ टक्के इतकी आहे.