नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून, नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून छाननीनंतर आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविल्याने जातेगावकरांना धक्का बसला आहे. दरम्यान, येत्या गुरुवारी (दि.२५) अर्ज माघारीसाठी अंतिम मुदत असून, निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी गुरुवारी (दि.१८) अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. नाशिक शाखेतून नियामक मंडळासाठी तीन सदस्य निवडून दिले जाणार आहेत. त्यासाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यात, नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, कार्यवाह आणि मध्यवर्ती शाखेचे विद्यमान सदस्य सुनील ढगे, नाट्यसेवाचे राजेंद्र जाधव, सुरेश गायधनी, नाट्यलेखक दत्ता पाटील, नाट्य व चित्रपट दिग्दर्शक सचिन शिंदे, फ्रेंड्स सर्कलचे संचालक विशाल जातेगावकर, प्रफुल्ल दीक्षित आणि गिरीश गर्गे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. प्राप्त अर्जांची छाननी होऊन विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. विशाल जातेगावकर यांनी सूचक म्हणून सतीश सामंत यांचेनाव दिले होते. परंतु, मतदार यादीत संतोष सामंत असे नाव आहे. त्यातही मतदाराचा पत्ताही अपूर्ण होता. २५ रोजी माघारी जातेगावकर यांच्या अर्जाला हरकत घेतल्यानंतर निवडणूक अधिकाºयांनी जातेगावकर यांचा अर्ज अवैध ठरविला. त्यामुळे, आता निवडणुकीच्या रिंगणात आठ उमेदवार उरले आहेत. मुंबईत सोमवारी (दि.२२) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली.४येत्या गुरुवारी (दि.२५) अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक स्तरावर प्रयत्न सुरू असले तरी कुणीही माघारी घेण्याच्या तयारीत नसल्याने प्रयत्नांमध्ये अडथळे निर्माण होत आहे. नाशिक शाखेचे एकूण १०५० मतदार आहेत.
नाशिक शाखेत आठ उमेदवार रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:02 AM