नाशिक : वेगाने विस्तारणा-या शहरात रस्ता रुंदीकरणात वड, पिंपळासारखे मोठे वृक्ष हटवण्यास न्यायालयाचे निर्बंध असल्याने यापुढे रस्ता दुभाजकांमध्ये अशा वृक्षांचे रोपणच न करण्याचे धोरण महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. भविष्यातील स्मार्ट सिटीचा विचार करता अशा प्रकारचे धोरण अनिवार्य ठरणार आहे.सिंहस्थ कुंभमेळा काळात शहरातील गंगापूररोड, दिंडोरीरोड या मार्गांचे रुंदीकरण करताना महापालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागले. या मार्गावरील वृक्ष तोडण्यास पर्यावरणप्रेमींनी हरकत घेत थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने काही अटी-शर्तींवर वृक्ष तोडण्यास परवानगी दिली. परंतु, वड, पिंपळ, नांदुरका यांसारखे सावली देणारे मोठे वृक्ष हटविण्यास मनाई केली. त्यामुळे, गंगापूररोडवरील सुमारे सात, तर दिंडोरीरोडवरील ३८ वृक्षं महापालिकेला हटवता आले नाही. महापालिकेमार्फत दरवर्षी वृक्षलागवड केली जात असते याशिवाय, शासनाच्या निर्देशानुसारही वृक्षलागवडीचे उपक्रम होत असतात. महापालिकेने गेल्या तीन-चार वर्षांत शहरातील अनेक रस्त्यांचे रुंदीकरण केले असून, दुभाजकांमध्ये वृक्षलागवड केलेली आहे. परंतु, भविष्यातील विकासाची दिशा लक्षात घेत उद्यान विभागाने आता दुभाजकांमध्ये वड, पिंपळ, नांदुरका यांसारख्या वृक्ष लागवडीवर फुली मारली आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेंतर्गत येत्या ५ ते १० वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत. भविष्यात मेट्रो, बीआरटीएस यांसारखे प्रकल्प राबविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आता दुभाजकांमध्ये वड, पिंपळासारख्या वृक्षांची लागवड केल्यास भविष्यात त्यांना हटविणे मुश्किल बनणार आहे. परिणामी, आतापासूनच रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये वड, पिंपळाचे वृक्षं लावण्याऐवजी ते रस्त्याच्या दुतर्फा लावण्यावरच भर देण्याचा विचार उद्यान विभागाने सुरू केला आहे आणि त्यानुसार, काही ठिकाणी त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केल्याची माहिती उद्यान विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. गंगापूररोड आणि दिंडोरीरोडवरील वड, पिंपळ वृक्षं हटविण्यास न्यायालयाची मनाई आहे. सद्य:स्थितीत न्यायालयात याचिका प्रलंबित असून, येत्या १६ फेबु्रवारीला सुनावणी आहे. तोपर्यंत गंगापूररोड व दिंडोरीरोडवरील मधोमध असलेल्या वृक्षांबाबतची समस्या कायम असणार आहे. दरम्यान, दुभाजकांमध्ये कमी उंचीची आणि शोभेची झाडे लावण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.३० टक्के वृक्ष मृतमहापालिकेने दीड वर्षांपूर्वी शहरात २१ हजार वृक्षांची लागवड मक्तेदारांमार्फत केली होती. त्यासाठी मक्तेदारांना दहा फूटावरील वृक्ष लागवडीचे बंधन घालण्यात आले होते. त्यानुसार, वृक्षलागवड झाली परंतु, त्यातील ७० टक्के झाडे जगल्याचा दावा महापालिकेच्या उद्यान विभागाने केला असून, उर्वरित ३० टक्के झाडांची पुन्हा एकदा संबंधित मक्तेदारांकडूनच लागवड करून घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नाशिकमध्ये रस्ता दुभाजकांमध्ये वड, पिंपळ वृक्ष लागवडीवर फुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 2:45 PM
महापालिका : उद्यान विभागाकडून धोरण राबविण्याचा विचार
ठळक मुद्देसिंहस्थ कुंभमेळा काळात शहरातील गंगापूररोड, दिंडोरीरोड या मार्गांचे रुंदीकरण करताना महापालिकेला मोठ्या दिव्यातून जावे लागलेभविष्यात मेट्रो, बीआरटीएस यांसारखे प्रकल्प राबविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही