सुयोग जोशी, नाशिक:नाशिकच्या विभागीय महसुल आयुक्तपदी डॅा. प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधाकृष्ण गमे हे आज निवृत्त झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. गेडाम हे राज्याचे कृषी आयुक्त होते. त्यांची बदली आता नाशिक येथे विभागीय आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. डॉ. गेडाम यांनी नाशिक महापालिका आयुक्त पदासह विविध शहरांमध्ये अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
त्यांनी २०१४ ते २०१६ या कालावधीत नाशिक मनपाच्या आयुक्तपदाची धूरा सांभाळली होती. त्यावेळी झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजनही त्यांनी काटेकोरपणे केले होते, त्यामुळे आगामी कुंभमेळ्याच्या पाश्व'भूमीवर त्यांची नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यांच्या सर्वोत्तम कारभाराची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना दिल्लीत बोलवून घेतले. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात आली. तेथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर त्यांनी परदेशात जाऊन हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांना राज्याचे कृषी आय़ुक्त आणि आता नाशिकचे विभागीय आयुक्त ही नवीन जबाबदारी देण्यात आली आहे.