नाशिक : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नाशिक विभागीय मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विभागाचा निकाल एकूण ८८.१३ टक्के इतका लागला आहे. नाशिक जिल्ह्याचा निकाल ८६.४८ टक्के, धुळे- ९३.७५, जळगाव- ८७.५९, नंदुरबार- ८८.८९ टक्के असा लागला आहे. विभागात धुळे जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक राहिला, तर नाशिक जिल्ह्याच्या निकालात गेल्या वर्षीच्या तुलनेत किमान दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचा निकाल ८८.५६ टक्के इतका लागला होता. विद्यार्थ्यांना येत्या ४ जून रोजी दुपारी कनिष्ठ महाविद्यालयांकडून गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाने दिली आहे.बारावीच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी मोठ्या प्रमाणात आगेकूच कायम ठेवली आहे. यावर्षीही नाशिक विभागात एकूण ८५.३० टक्के मुले उत्तीर्ण झाली, तर ९१.८८ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातही मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा अधिक आहे. एकूण ९०.२७ टक्के मुली जिल्ह्यात उत्तीर्ण झाल्या, तर ७८.१९ टक्के मुले बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. कोकण मंडळाचा राज्यात निकालामध्ये प्रथम क्रमांक असून, या मंडळात ९७.६० टक्के इतके मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण आहे. एकूण निकाल ९५.६८ टक्के इतका लागला आहे.
नाशिक विभागाचा टक्का घसरला
By admin | Published: May 27, 2015 11:48 PM