नाशिक : ५६ व्या महाराष्ट्र राज्य अंतिम हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत पुणे येथील प्रयोग संस्थेने सादर केलेले ‘एमएच-१२ जे १६’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले आहे. नाशिकच्या मेनली अॅमॅच्युअर्स या संस्थेने सादर केलेल्या ‘गांधी हत्त्या आणि मी’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकाविला. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने राज्य नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल घोषित केला आहे. त्यात नाशिकच्या नाटकाने द्वितीय क्रमांक मिळविला. ‘गांधी हत्त्या आणि मी’ या नाटकाला रंगभूषेबद्दल द्वितीय पारितोषिक माणिक कानडे यांना तसेच संगीत दिग्दर्शनाचे द्वितीय पारितोषिक तेजस बिल्दिकर यांना मिळाले आहे. उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्यपदक महेश डोकफोडे आणि सुरभी पाटील यांना जाहीर करण्यात आले आहे. याशिवाय, अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्र याच नाटकातील अक्षय मुडावदकर यांना जाहीर झाले आहे. दि. २२ फेबु्रवारी ते ४ मार्च या कालावधीत पुणे येथील टिळक स्मारक मंदिर आणि भरत नाट्य संशोधन मंदिरात स्पर्धा रंगली होती. त्यात २० नाट्यप्रयोग सादर झाले होते. परीक्षक म्हणून विश्वास मेहेंदळे, मनोहर जोशी, सुरेश गायधनी, हेमंत एदलाबादकर, श्रीमती वसुधा देशपांडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
राज्य नाट्य स्पर्धेत नाशिकचे नाटक द्वितीय
By admin | Published: March 07, 2017 2:05 AM