नाशिक : पूर्व मतदारसंघात यंदा भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत होत असून, दोन्ही तुल्यबळ उमेदवार असले तरी, या मतदारसंघात ऐनवेळी घडलेल्या राजकीय घटना, घडामोडी पाहता, त्यात कोण बाजीगर ठरतो याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. पाचवी फेरी पुर्ण झाली असून भाजपचे राहुल ढिकले यांना १२ हजार ७८३ मते तर बंडखोरी के रून मनगटावर घड्याळ बांधून रिंगणात उतरलेले बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे. त्यामुळे या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली आहे.निवडणूक जाहीर झाल्यापासून पूर्व मतदारसंघात अनेक राजकीय घटना घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना पक्षाने उमेदवारी देऊ नये यासाठी सानप विरोधकांनी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या, तर सानप समर्थकांनीही उमेदवारी मिळावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले; परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, उलटपक्ष मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज सानप यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधून उमेदवारी अर्ज दाखल केला.या मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी महापौर अशोक मुर्तडक यांना उमेदवारी दिली. त्यांनी नामांकनही भरले; परंतु माघारीच्या दिवशी नाट्यमय घडामोडीत मुर्तडक यांनी माघार घेतली. त्यांच्या माघारीने कोणाला राजकीय लाभ होईल हे नव्याने सांगण्यास नको; मात्र याचवेळी कॉँग्रेस आघाडीतच बिघाडी झाली. जागावाटपात पूर्वची जागा कॉँग्रेसच्या वाट्याची असल्याने ही जागा कॉँग्रेसने कवाडे गटाला सोडलेली असताना राष्ट्रवादीने सानप यांना उमेदवारी देऊन बिघाडी केली; मात्र मतदारसंघात भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण होत असताना कवाडे गटाचे गणेश उन्हवणे यांनी माघार घ्यावी यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले गेले. त्यात यश मिळू शकले नाही. त्यामुळे वरकरणी या मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र असले तरी, खरी लढत सानपविरुद्ध ढिकले अशीच आहे. दोन्ही पक्षांनी आयात उमेदवार दिल्याने जुने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची त्यांना निवडणुकीत कितपत साथ मिळते हा प्रश्नच आहे.--विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये नाशिक पूर्व मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. या मतदारसंघात पंचवटी, मखमलाबाद, नाशिकरोड, आडगाव, जेलरोड, पंचक, दसक या भागांचा समावेश आहे. शहरी व ग्रामीण असे संमिश्र मतदार आहेत.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. त्यात मनसेने उत्तमराव ढिकले यांना उमेदवारी दिली व त्यांनी बाजी मारली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे देवीदास पिंगळे यांनी बंडखोरी केली होती. मात्र त्याचा फायदा मनसेलाच झाला.२०१४ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तसेच मनसेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यावेळी मोदी लाटेत भाजपच्या बाळासाहेब सानप यांनी बाजी मारली. गेल्या पाच वर्षांत या मतदारसंघातील अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत.
नाशिक निवडणूक निकाल : पुर्वमध्ये सानपविरूध्द ढिकले यांच्यात मोठी चुरस; दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 11:11 AM
Nashik vidhansabha election results 2019बाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते मिळाली आहेत. दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक असून या मतदारसंघात ‘टफ फाईट’ होताना दिसू लागली आहे.
ठळक मुद्देबाळासाहेब सानप यांना ११ हजार ९३८ मते दोघांमध्ये केवळ ८४५ मतांचा फरक अदोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये धाकधुक निर्माण झाली