येवला (नाशिक)- बिगफाइट म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या येवला मतमदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते व आमदार छगन भुजबळ बाराव्या फेरीअखेर २३५७१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराव्या फेरीअखेर भुजबळ यांना ६०१०४ मते मिळाली होती तर त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे संभाजीराव पवार यांना ३७,५३३ मते मिळालेली आहेत.येवला मतदारसंघात सन २००४ पासून गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकांमध्ये मतदारसंघातील जनतेने राष्टÑवादीतील हेविवेट नेते म्हणून छगन भुजबळ यांना संधी दिली आहे.राष्ट्रवादीचा प्रभाव नसताना केवळ भुजबळ यांच्या विकासाचे कार्ड सतत १५ वर्षे जनतेने उचलून धरले आहे. विकासाच्या मुद्द्यावर गेल्या तीन निवडणुका लढल्या गेल्या. यंदा मात्र तालुक्यात भूमिपुत्राचा मुद्दा प्रकर्षाने विरोधकांनी पुढे आणला आहे. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील बंडखोरी टळली. यामुळे मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशी सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीसह उर्वरित अपक्ष उमेदवारांची फारशी चर्चा नाही. विरोधी नेते भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून एकवटले आहेत. अशा परिस्थितीत हट्ट्रिक साधणारे आमदार छगन भुजबळ यांच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीनंतर येवल्याचा राजकीय रंग काहीसा बदलला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली पंचायत समिती आता सेनेच्या ताब्यात आहे. जिल्हा परिषदेत सेनेचे तीन सदस्य आहेत, तर राष्ट्रवादीचे केवळ दोन सदस्य आहेत. गेल्या विधानसभेला भुजबळांच्या पाठीशी सारे नेते होते. यावेळी मात्र दोन्ही दराडे बंधू सेनेचे आमदार झाले आहेत. भुजबळ समर्थक माणिकराव शिंदे यांनी सेनेचा प्रचार केला. संभाजी पवार आणि मारोतराव पवार यांची दिलजमाई झाली आहे. हे सर्व भुजबळ यांच्या विकासाच्या मुद्द्याला आव्हान देणार काय, हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. सध्या भुजबळांच्या साथीला १५ वर्षांत केलेला विकास आणि सहकार नेते अंबादास बनकर व त्यांच्या फळीची साथ तसेच सुप्तावस्थेतील सर्वसामान्य, या तीन गोष्टी आहेत. तालुक्यात आपापसातील संघर्ष आणि बेकीच्या राजकारणाचा परिणाम वेळोवेळी निकालात दिसला आहे. या निवडणुकीत सारे भिडू एकत्र आले आहेत. मात्र जनतेच्या मनात असणारा कौल, प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी घडणाऱ्या घडामोडी यावर विजयाचे गणित ठरणार आहे. विकास मंदावल्याचा आरोप विरोधक करत असले तरी भुजबळांचे मात्र यंदाही विकासाचे कार्ड पुन्हा प्रभावी ठरली आहेत.