नाशिक :देवळाली मतदारसंघात अनपेक्षित असा मोठा बदल मतदारराजाने घडविला असून राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या नवख्या उमेदवार सरोज आहिरे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार डॉ. योगेश घोलप यांचा दणदणीत दारूण पराभव केला. आहिरे यांनी तब्बल ४१ हजार ८६० मते मिळवून विजयोत्सव साजरा केला. घोलप यांच्या तीस वर्षांच्या सत्तेला आहिरे यांच्या विजयाने सुरूंग लावला.शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघाची ओळख पुसली गेली. या मतदारसंघात आहिरे यांच्या विजयाने राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. येथील माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या कुटुंबीयांभोवतीच यापुर्वी देवळालीचे राजकारण कायम फिरत राहिले. गेल्या तीस वर्षांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घोलप कुटुंबीयांसाठी यंंदाची निवडणूक मात्र अस्तित्वाची होती. मतदारसंघातील पहिल्या महिला उमेदवार आणि घोलप यांना आव्हान देण्याचे आहिरे यांनी धाडस करत त्यांचे अस्तित्व संपुष्टात आणले आहे. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात घोलप यांना नेहमीच मतविभागणीचा फायदा झालेला आहे किंबहुना त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये अनेकांना रिंगणात उतरवून तशी राजकीय खेळी यशस्वी करूनही दाखविलेली आहे. त्यांचे हे काम यंदा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारीमुळे आपसूकच घडून येईल, असे मनसुबे आखले गेले मात्र वंचित आघाडीला कुठलीही मुसंडी मारता आली नाही. घोलप यांच्यासमोर उभे राहण्याचा चंग बांधत सरोज अहिरे यांनी युतीच्या घोषणेनंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवून लक्ष वेधून घेतले. अहिरे यांची उमेदवारी देवळालीतील समीकरण बदलवणारी ठरली. अर्थात घोलप यांच्या पारंपरिक मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे आणि आपली भूमिका त्यांच्यात रुजविण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते; मात्र ते आव्हान आहिरे यांनी लिलयापणे पेलले.बहुतांश ग्रामीण भाग या मतदारसंघाला जोडला असल्यामुळे त्यांनी लोकांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचे मतांच्या आकडेवारीवरून दिसून येते. लक्ष्मण मंडाले यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली नसली तरी त्यांनी केलेल्या तयारीमुळे मनसेकडून रिंगणात असलेल्या त्यांच्या मुलाच्या पारड्यात पडणारे मतदानही राष्ट्रवादीचे समीकरण बिघडवू शकले नाही.
नाशिक निवडणूक निकाल : राष्ट्रवादीच्या सरोज आहिरे यांचा विजय; घोलपांच्या तीस वर्षांच्या सत्तेला सुरूंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 3:51 PM
Nashik Vidhansabha Election 2019 शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघाची ओळख पुसली गेली. या मतदारसंघात आहिरे यांच्या विजयाने राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे.
ठळक मुद्देराष्ट्रवादीचे समीकरण बिघडवू शकले नाही.आहिरे यांनी धाडस करत घोलप कुटुंबीयांचे अस्तित्व संपुष्टात आणले