नाशिक : मध्य मतदारसंघाने गेल्या दोन निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षांना साथ दिली आहे. यामुळे विशिष्ट पक्षाचा प्रभाव जाणवत नव्हता. यंदाही युती, आघाडी आणि मनसे अशी तिरंगी लढत या मतसादरसंघात पहावयास मिळाली; मात्र मतमोजणीनंतर ही लढत थेट एकतर्फी झाली आणि मतदारांचा कल ११व्या फेरीअखेर देवयानी फरांदे यांनी ११ हजार ५५४ मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांना ३५ हजार ८४५ मते तर कॉँग्रेसच्या हेमलता पाटील २४ हजार २९१ मनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे.पाटील आणि फरांदे यांच्या मतांच्या आकडेवारीत मोठा फरक असल्यामुळे जवळपास फरांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.नाशिक शहरातील मतदारसंघांची पुनर्रचना २००९ मध्ये झाल्यानंतर या मतदारसंघांत सर्वप्रथमच महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने झेंडा रोवला होता, तर त्यानंतर २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या देवयानी फरांदे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे या मतदारसंघात सामाजिक राजकीय गणिते काहीही असो मात्र हा निव्वळ शहरी मतदार हे भावनेवर स्वार होणारे असल्याचे स्पष्ट झाले आहे.यंदा भाजपने अनेक इच्छुकांना डावलून देवयानी फरांदे यांना उमेदवारी दिली आहे. तर दुसरीकडे कॉँग्रेसने डॉ. हेमलता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेस पक्षात खरे तर नेहमीच उमेदवारीसाठी स्पर्धा असते; परंतु यंदा ऐनवेळी उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. तर मनसेने नितीन भोसले यांचा नाशिक पश्चिम मतदारसंघ बदलून त्यांना मध्य मध्ये उभे केले आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संजय साबळे यांच्यासह अन्य उमेदवार रिंगणात आहेत.गेल्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी नसल्याने पक्षीय उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. यंदा मात्र युती आणि आघाडी झाली आहे; परंतु त्यातील युती आघाडीतील एकजिनसीपणा मात्र दिसत नाही. युतीत जसा शिवसेनेने हात आखडता घेतला तसा आघाडीतदेखील राष्टÑवादीचा एक गट नाराज आहे.या निवडणुकीत मनसेला समवेत घेण्याचे प्रयत्न फोल ठरल्याने भाजपला पर्याय ठरू शकणाऱ्या आघाडीतदेखील मत विभागणी होणार आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी प्रस्थापित पक्षांची किती मते घेणार यावर निर्णय होऊ शकतो.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे* नदीकाठच्या पूररेषेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून, तो सुटलेला नाही.* गावठाण पुनर्वसनाचा प्रश्न क्लस्टरच्या लालफितीत.* वाहतूक कोंडीच्या जटिल समस्येवर तोडगा नाही, नियोजन कागदावरच.*स्मार्ट सिटीमुळे रस्त्यापासून गावठाण सुविधांची झालेली कोंडी.गावठाण स्पिरीट कितपत प्रभावी ?* पुनर्रचनेपूर्वीचा नाशिक मतदारसंघाचा विचार केला तर गावठाण भागातील फार कमी उमेदवारांना संधी मिळाली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी उमेदवार गावठाणातीलच हवा अशी एक खेळी सुरू झाली होती; मात्र नंतर ती मागे पडली. कॉँग्रेसने गावठाणातील शाहू खैरे यांना उमेदवारी दिली, मात्र त्यांनी ती मागे घेतल्यामुळे मतदारसंघातील पश्चिम भागातील उमेदवारी देण्यात आली. भाजपच्या उमेदवार देवयानी फरांदे त्याच भागातील आहेत. तर दुसरीकडे नितीन भोसले गावठाण भागातील आहेत. पश्चिम भागातील उमेदवारांचादेखील गावठाणावर विशेष भर असून, हा भाग कोणाला साथ देतो हेदेखील महत्त्वाचे आहे.विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेत २००९ मध्ये नाशिक मध्य या मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. जुने नाशिक गावठाण आगार टाकळीपासून हा मतदारसंघ सुरू होतो आणि थेट कॉलेजरोड, गंगापूररोडच्या दुसºया टोकापर्यंंत यात समावेश आहे.२००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत आघाडी विरुद्ध युती आणि मनसे अशी तिरंगी लढत झाली. मनसेच्या वसंत गिते यांना उमेदवारी दिली व त्यांनी बाजी मारली होती. परप्रांतिय-मराठी वाद आणि रोजगार हे त्यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले मुद्दे प्रभावी ठरले होते.२०१४ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी तसेच मनसेने स्वतंत्र निवडणुका लढविल्या. त्यावेळी मोदी लाटेत भाजपाने बाजी मारली. आताही काश्मीरमधील ३७० कलम हटविणे आणि तिहेरी तलाक हे मुद्दे तारतील, अशी भाजपला अपेक्षा आहे.