नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) साठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित होताच इच्छुकांनी उमेदवारीसाठी बाशिंग बांधले असून, पक्षीयस्तरावर हालचाली सुरू केल्या आहेत. मनसेकडून भोसले कुटुंबीयातीलच सदस्य रिंगणात उतरणार असल्याने अन्य राजकीय पक्षांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून असणार आहे. दरम्यान, शिवसेना-भाजपाने मात्र सदर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत तर कॉँग्रेस-राष्टवादीकडून सावध भूमिका घेतली जात आहे. येत्या १३ मार्चपासून नामनिर्देशनपत्र दाखल होण्यास सुरुवात होणार आहे.प्रभाग क्रमांक १३ मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घोषित केली असून, येत्या ६ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे. पोटनिवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी (दि.७) घोषित होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट नवनिर्माण सेनेकडून भोसले कुटुंबीयातीलच सदस्याला उमेदवारी दिली जाणार आहे. त्यासाठी उमेदवारीचे अधिकार पक्षाने माजी आमदार नितीन भोसले यांच्याकडे सोपविले आहेत. त्यानुसार, भोसले कुटुंबीयातील अॅड. वैशाली मनोज भोसले यांची उमेदवारी निश्चित करण्यात आलेली आहे. पक्षाकडून येत्या दोन दिवसांत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अॅड. वैशाली भोसले या माजी उपनगराध्यक्ष भगीरथ खैरे यांच्या सुकन्या असून, कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांच्या भगिनी आहेत. फेबु्रवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ मध्ये कॉँग्रेस, राष्टवादी व मनसे यांनी एकत्रितरीत्या निवडणूक लढविली होती. या पॅटर्नला प्रभागात यशही मिळाले. त्यामुळे भोसले कुटुंबीयातीलच सदस्य उमेदवारी करणार असल्यास कॉँगे्रस-राष्ट्रवादी आपला उमेदवार देणार नाही, अशी जाहीर भूमिका सुरेखा भोसले यांच्या अंत्यविधीप्रसंगी शोकसभेतच दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी केली होती. या भूमिकेला पक्षातून काही इच्छुकांकडून विरोध झाल्याने आता दोन्ही पक्षांकडून सावध भूमिका घेतली जात असून, पक्षस्तरावर चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपा व शिवसेनेने मात्र पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार शिवसेनेकडून माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या सुकन्या स्नेहल यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. स्नेहल यांनी फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत इतर मागास प्रवर्ग महिला गटात निवडणूक लढवताना ९५९३ मते घेतली होती. त्यामुळे शिवसेनेकडून त्यांचेच नाव पुढे केले जाण्याची शक्यता आहे. भाजपाकडून कीर्ती शुक्ल यांनी निवडणूक लढवताना ६८३१ मते घेतली होती. त्यामुळे भाजपाकडून त्यांच्या नावाचा पुनर्विचार केला जाऊ शकतो.
नाशकात प्रभाग १३ मधील पोटनिवडणुकीच्या हालचाली सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 4:02 PM
चुरस वाढणार : भोसले कुटुंबीयातील सदस्य रिंगणात
ठळक मुद्देशिवसेना-भाजपाने मात्र सदर निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेतकॉँग्रेस-राष्टवादीकडून सावध भूमिका