नाशिक- सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना येत्या १ एप्रिलपासून औद्योगिक दराने घरपट्टी आकारण्यात येणार असूनत्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक महापालिकेत आमदार सत्यजीत तांबे तसेच महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर तसेच निमा व आयमा या उद्योजकांच्या संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज दुपारी ही बैठक पार पडली.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून महापालिकेला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. मात्र, त्यांच्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असून त्या अनुषंघाने ही बैठक घेण्यात आली. औद्येागिक क्षेत्राला औद्याेगिक घरपट्टी दराऐवजी वाणिज्य दर लावले जातात. हे दर औद्योगिकच्या तुलनेत सुमारे सात ते आठ टक्के अधिक असून त्यामुळे मोठा भुर्दंड सोसावा लागत हाेता. मात्र आज झालेल्या बैठकीत औद्योगिक दराने घरपट्टी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय औद्येागिक क्षेत्रात महापालिकेच्या वतीने मलवाहिका टाकण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार असून वसाहतीतील रस्ते आणि दिवे ही सर्व कामे कुंभमेळ्याच्या खास आराखड्यातून करण्याचे ठरवण्यात आले आहे.