अरबी समुद्रात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अन् शनिवारपासून पाकिस्तानात उठलेल्या धुळीच्या वादळाने रविवारी गुजरातच्या दिशेने सुरू केलेले मार्गक्रमण यामुळे शहराच्या वातावरणात या चार दिवसात कमालीचा बदल झाला आहे. या बदलाने नाशिककरदेखील आश्चर्यचकित झाले. रविवारी दिवसभर नागरिकांना सूर्यदर्शनही दुर्लभ झाले होते. सोमवारी सकाळी उशिराने का होईना, सूर्यदर्शन घडले. तसेच वातावरणातील धुके व धुरक्यांचे प्रमाणही घटले. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. वाऱ्याचा वेग सोमवारी मंदावला होता; मात्र पारा कमालीचा घसरल्याने थंडीची तीव्रता प्रचंड वाढल्याचा अनुभव नागरिकांना आला.
आर्द्रता व बाष्पचे प्रमाण घटले
सोमवारी सकाळी हवेत आर्द्रता व बाष्पचेही प्रमाण कमी झालेले दिसून आले. अंधुक वातावरणदेखील निवळले होते. सकाळी आर्द्रता ६४ टक्के इतकी होती. शहराच्या हवेच्या गुणवत्तेतदेखील काही प्रमाणात सुधारणा झाली. दिवसभर आकाश निरभ्र होते. दुपारपासून कडक ऊन पडले होते.
१७जाने. २०२०ची पुनरावृत्ती
मागील वर्षी १७ जानेवारी रोजी थंडीचा असाच कडाका नाशिककरांनी अनुभवला होता. त्या दिवशीही शहराचे किमान तापमान ६ अंशापर्यंत खाली घसरल्याची नोंद झाली होती. २३ डिसेंबर रोजीसुद्धा पारा ८.२ अंशापर्यंत खाली घसरल्याने नाशिककर गारठले होते.
१२ वर्षांचे नीचांकी तापमान असे (अंश. सेल्सि.)
९फेब्रु. २००८ - ३.५
३१डिसें.२००९ - ७.८
२१डिसें.२०१० - ५.४
७ जाने.२०११ - ४.४
९फेब्रु. २०१२ - २.७
६जाने.२०१३- ४.४
२५ डिसें. २०१५ - ५.४
२२ जाने. २०१६- ५.५
११ जाने. २०१७- ५.८
२५ जाने. २०१८- ७.२
२८डिसें.२०१९- ११.४
१७ जाने.२०२०- ६.०