नाशिक : निलकृष्णा इंडस्ट्रीज या कंपनीत गुंतवणूक करून त्यातून अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून चौघा संशयितांनी सातपूर येथील चेतन राजेंद्र गुंजाळ (३६. रा. शिवाजीनगर मार्केटजवळ) यांची तब्बल ९ लाख १५ हजार १५० रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतन गुंजाळ यांनी सातपूर पोलिस ठाण्यात त्यांची फसवणूक झाल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चुंचाळे शिवारातील जाधव संकूल येथील संशयित राहूल किरण पाटील (३६), सुरेखा किरण पाटील (३६), शीतल राहूल पाटील (३०) किरण पाटील (५५) या चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यातील संशयित गुंजाळ यांच्या ओळखीचे असून संशयितांनी संगन्मत करून गुंजाळ यांना २८ जानेवारी २०२० ते २४ सप्टेंबर २०२० या कालावधीत निलकृष्णा इंडस्ट्रीज या कंपनीत पैसे गुंतवणून त्यातून अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून पैसे गुंतविण्यास भाग पाडले.
मात्र गुंजाळ यांनी पाटील यांच्याकडे पैसे परत मगीतले त्यावेळी पाटील यांनी त्यांना शिविगाळ व दमबाजी करून त्यांची फसवणूक केली. त्यामुळे गुंजाळ यांनी सातपूर पोलिस ठाण्यात पाटील यांच्याविरोधात फिर्याद दिली असून पोलिसांनी चारही संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक उबाळे अधिक तपास करीत आहेत.