नाशिक : फटाके फोडल्याच्या कारणावरून वाद घालत शेजारच्यांनी युवकाच्या डोक्यात बॅटने जोरदार प्रहार करून ठार मारल्याची घटना १४ नोव्हेंबर २०२० मध्ये सातपूर येथे घडली होती. या खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा व सत्र न्यायालयाने पित्यासह दोघा पुत्रांना मंगळवारी (दि.१४) जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एस. कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तिघा आरोपींनी संबलदेव रामसिंगार यादव (३०, रा. विश्वासनगर) या युवकाला ठार मारले होते.
मयत संबलदेव यांच्या पत्नी संगीता संबलदेव यादव यांनी सातपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार १४ नोव्हेंबर रोजी संबलदेव याचा साला अमरजित यादव व विशाल यादव यांच्यात वाद सुरू होता. त्यामुळे संदीप चाैहान तेथे गेला व त्याने आरडाओरड का करता असा जाब विचारला. त्यावेळी अमरजित यादवने ‘हा आमचा आपसातील विषय आहे, तू मध्ये का बोलतो’ असे उत्तर दिले. त्याचा राग आल्याने चौहान कुटुंबीयांनी बॅटने संबलदेव यास मारहाण करीत गंभीर जखमी केले होते.
यामुळे उपचारादरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी संबलदेवचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात संशयित सुकट मोहोदर चौहान (५८), संदीप सुकट चौहान (२२), संजय सुकट चौहान (२५, सर्व रा. सातपूर ) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक टी. एम. राठोड यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या तिघांना जिल्हा न्यायालयाने अंतिम सुनावणीत खुनाच्या गुन्ह्यात दोषी धरले. सरकारी पक्षातर्फे ॲड. सचिन गोरवाडकर यांनी युक्तिवाद केला. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी यांनी आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार, असा एकूण सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.