मागच्या महिनाभरापासून महायुतीमध्ये कळीचा मुद्दा ठरलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाबाबतचा तिढा अखेर सुटला आहे. महायुतीमध्ये नाशिकची जागा ही शिवसेना शिंदे गटाकडे राहणार हे स्पष्ट झाले असून, शिंदे गटाकडून येथे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचा सामान ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याशी होणार आहे. हेमंत गोडसे यांनी शिवसेनेकडून लढताना २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत नाशिकमधून विजय मिळवला होता. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते ठाकरे गटात गेले होते. आता पुन्हा एकला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यानंतर सलग तिसऱ्यांदा बाजी मारून येथे विजयाची हॅटट्रिक करण्याचा गोडसे यांचा प्रयत्न असेल.
लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्यापासून महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या काही मतदारसंघांवरून तिढा निर्माण झालेला होता. त्यात नाशिक लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघातून भाजपा निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, नाशिक दौऱ्यावर गेलेल्या श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यावरून महायुतीमध्ये नाराजी निर्माण झाली होती. तसेच हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली होती.
त्यानंतर नाशिकमधून महायुती छगन भुजबळ यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा सुरू झाली होतीत. मात्र शिंदे गटाने या मतदारसंघावरील आपला दावा ठाम ठेवला होता. अखेरीस भुजबळ यांनी उमेदवारीच्या शर्यतीमधून माघार घेत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर हेमंत गोडसे यांचं नाव पुन्हा एकदा शर्यतीत आलं होतं. तसेच आज शिंदे गटाकडून त्यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.