नाशिक : विल्होळी व परिसरातील आंब्याच्या झाडांवर विषारी केसाळ सुरवंट नाावाच्या किड्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून, आंब्याच्या झाडाची पाने खाण्याची मुख्य काम या किड्याचे आहे. सुरुवातीला साधा किडा म्हणून त्याकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले, परंतु त्याच्या संपर्कात आल्यावर अनेकांना जखमा झाल्या असून, अंग खाजणे, सूज येणे, आग होण्याचे प्रकार घडू लागल्याने याबाबत कृषी खात्याला अवगत केले असता, त्यांनीही किड्याबाबत अनभिज्ञता दर्शविली. सदर किडा वैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.विल्होळी परिसरात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या आंब्याची लागवड केली असून, दरवर्षी त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जाते. यंदा मात्र पावसाळ्यातच पहिल्यांदाच आंब्याच्या झाडांना कीड लागण्याचा प्रकार घडला आहे. केसाळ सुरवंट नावाच्या विषारी किडीने अनेक झाडांना घेरले असून, झाडाची पाने खाण्याचे कामे ही किडे करतात, पानाच्या हिरवा भाग किडे फस्त करीत असून, फक्त पानाच्या शिरा शिल्लक राहत आहेत. त्यामुळे पुन्हा नव्याने झाडाला पान येण्याची शक्यता मावळली आहे. विषारी असलेल्या केसाळ सुरवंटाचे डोके लाल असून, डोक्यावर व मागच्या भागाला केसाळ गुच्छ आहे. सदर किड्याचा स्पर्श झाल्यास त्या जागेवर प्रचंड खाज सुटून नंतर सूज येते. ज्या ठिकाणी किड्याचा दंश होतो तो भाग दोन ते तीन दिवस ठणकतो व त्यातून आग होण्याचे प्रकार घडू लागले आहेत. परिसरातील अनेक शेतक-यांना त्याचा डंख झाला आहे. या सा-या प्रकारामुळे कृषी खात्याकडे तक्रार करण्यात आली असता, मंडळ कृषी अधिकारी सुभाष धायडे, पर्यवेक्षक प्रफुल्ल पडोळे, सहायक पूनम पाटील, ज्योती सांगळे यांनी विल्होळीला भेट देऊन आंब्याच्या झाडांची पाहणी करून किड्याची माहिती जाणून घेतली. या किडीचा नायनाट करण्यासाठी सायपरमेथ्रीन, डेल्टामेथ्रीन फल्युवॉलिएंट, फेनव्हलरेटसारख्या कीटकनाशकांचे फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी शेतकºयांना दिला व किड्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी किडा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे.